विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:27 IST2025-05-07T14:27:13+5:302025-05-07T14:27:41+5:30
मागील अनेक दिवसांपासून या भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

File Photo
Naxalite Enconter : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील विजापूर जिल्ह्याच्या कर्रेगुट्टा टेकड्यांवर नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी पहाटे झालेल्या चकमकीत 15+ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. सीआरपीएफचे डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह दिल्लीहून या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
छत्तीसगडचे एडीजी नक्षल ऑपरेशन्स विवेकानंद सिन्हा, सीआरपीएफ आयजी राकेश अग्रवाल आणि बस्तर आयजी पी. सुंदरराज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांना डीआरजी, कोब्रा, सीआरपीएफ, एसटीएफचे सैनिक सतत प्रत्युत्तर देत आहेत.
Mission Sankalp | More than 15 naxals killed by Security Forces in an ongoing encounter near Karegutta Hills in Bijapur district along Chhattisgarh-Telangana border, says a Police official. pic.twitter.com/XG1tD48HqT
— ANI (@ANI) May 7, 2025
आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे ऑपरेशन संकल्पमध्ये जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स, विशेष कार्य दल (STF), राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांची विशेष युनिट कोब्रा यासह विविध युनिट्समधील सुमारे 24000 सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत.
या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टेकड्या वेढल्या असून, सतत कारवाई करत आहेत. बुधवारी सकाळपासूनच या टेकडीवर जोरदार कारवाई सुरू होती. या दरम्यान सुरक्षा दलांनी चकमकीत 20 नक्षलवाद्यांना ठार केले.
14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण
नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतरही ही कारवाई थांबलेली नाही. करेगुट्टाच्या टेकड्यांवर अजूनही गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, बस्तरमध्ये नक्षलवादी स्वतः आत्मसमर्पण करत आहेत. बस्तरमधील 14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 13 नक्षलवादी हे विजापूरचे रहिवासी होते. यापूर्वी तेलंगणामध्ये 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.