Kota Bank Fraud: गेल्या काही दिवसांपासून बँका आणि बँक व्यवस्थापकांकडून सामान्य लोकांशी होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशातच एका घटनेत राजस्थानमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजरने फसवणूक करून ग्राहकांच्या खात्यातून ४ कोटी ५८ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे काढण्यापूर्वी बँक मॅनेजर ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलत असे. मात्र तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आणि मॅनेजरने हा सगळा घोटाळा केल्याचे समोर आलं. त्यानंतर महिला बँक मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
राजस्थानातील कोटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ता हिने ग्राहकांच्या खात्यातून फसवणूक करून ४ कोटी ५८ लाख रुपये काढले. साक्षी गुप्ता हे पैसे शेअर बाजारात गुंतवत होती. या ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून ती पैसे काढण्यापूर्वी ग्राहकांचे मोबाईल नंबर देखील बदलत होती. आरोपी साक्षीने तिच्या कुटुंबाचे लाखो रुपयेसुद्धा शेअर बाजारात गुंतवले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर साक्षी गुप्ताला अटक झाली. पोलिसांच्या तपासात साक्षी गुप्ताने अडीच वर्षांत ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून पैसे काढल्याचे समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी गुप्ताने २०२० ते २०२३ या कालावधीत बँक खात्यांमधून पैसे काढले. त्या काळात बँकेच्या एका ग्राहकाने १.५० लाख रुपयांच्या एफडीची माहिती मागितली होती. तसेच १५ फेब्रुवारी २०२३ रोजी बँकेच्या एका ज्येष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून ३ कोटी २२ लाख रुपये काढण्यात आले होते. ती तक्रार करण्यासाठी बँकेतही आली. यानंतर बँकेने चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान,अधिकाऱ्यांना साक्षी गुप्तावर संशय आला. साक्षी गुप्ताने ग्राहकाच्या सूचनांशिवाय ही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. तिने ते खाते 'पूल अकाउंट' म्हणून वापरले होते.
३१ ग्राहकांच्या एफडी वेळेच्या आधीच बंद करताना साक्षीने १ कोटी ३४ लाख ९० हजार २५४ रुपये तिच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. तिने ३ लाख ४० हजार रुपयांचे वैयक्तिक कर्जही फसवणूक करुन मंजूर करुन घेतले. साक्षीने काही ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले आणि त्याच्या जागी तिच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर टाकले. त्यामुळे पैसे वळवताना ओटीपी आणि अलर्ट मेसेज खऱ्या ग्राहकांकडे गेलेच नाहीत.
बहुतेक ट्रान्झॅक्शन इंस्टा किओस्क आणि डिजिटल बँकिंग चॅनेलद्वारे केले गेले. साक्षीने चार ग्राहकांच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएम आणि इंटरनेट बँकिंगद्वारेही व्यवहार केले. तिने तिच्या डीमॅट खात्यांमध्ये बेकायदेशीर पैसे देखील पाठवले. यासोबत साक्षी गुप्ताने तिच्या वडिलांचे ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले होते. तिने कुटुंबातील इतर अनेक सदस्यांच्या खात्यांमधून पैसे घेऊन ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले होते. मात्र घरच्यांना याचा पत्ताच नव्हता. साक्षी कॉम्प्युटरवरुन मोबाईल नंबरचा ओटीपी बदलत होती, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलवर मेसेज जात नव्हते.
तक्रारीनंतर साक्षी गुप्ताला ३१ मे रोजी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तिने सांगितले की, मी बँक ग्राहकांना मोबाईल नंबर बदलण्यासाठी फॉर्म भरायला लावला आणि त्यात माझ्या कुटुंबाचे नंबर टाकले, जेणेकरून पैसे काढल्याचा मेसेज खातेदारापर्यंत पोहचणार नाही. मी खातेदाराच्या खात्यातून पैसे काढले आणि ते स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. दुसरीकडे, या संपूर्ण फसवणुकीत तिच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी होते? याचा तपास सुरू आहे.