दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर नौसेना सतर्क, तामिळनाडूत सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:12 PM2019-08-24T20:12:41+5:302019-08-24T20:16:46+5:30

लष्कर-ए-तय्यबाकडून पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

fear of terrorist attack naval on alert security increased in tamilnadu | दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर नौसेना सतर्क, तामिळनाडूत सुरक्षा वाढवली

दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर नौसेना सतर्क, तामिळनाडूत सुरक्षा वाढवली

Next

नवी दिल्लीः लष्कर-ए-तय्यबाकडून पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौसेना सज्ज झाले असून, तामिळनाडूतल्या समुद्री मार्गे दहशतवादी घुसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्री क्षेत्रात हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. तसेच तपास यंत्रणांनी 6 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कथित घुसखोरी करणाऱ्यांना मदत करत असल्याच्या संशयातून या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. केरळच्या संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं की, गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर भारतीय नौसेना समुद्र आणि किनारपट्टीच्या भागातल्या स्थितीवर नजर ठेवून आहे.

तत्पूर्वी श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

भारतामध्ये याआधी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. तसेच गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: fear of terrorist attack naval on alert security increased in tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.