"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:14 IST2025-10-30T10:13:04+5:302025-10-30T10:14:04+5:30
माहेरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहून महिलेच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला.

फोटो - AI
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील भोजपूर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहून महिलेच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. १५ ते २० मिनिटांतच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी आता या मृत्यूसाठी जावयाला जबाबदार धरलं आहे.
भोजपूरमध्ये राहणाऱ्या शाइन मन्सूरीला तिचा पती सद्दामने घटस्फोटाची नोटीस पाठवली. पोस्टमनने मुलीचे वडील सलीम यांना घटस्फोटाची नोटीस देताच ते पूर्णपणे हादरून गेले. थोड्या वेळानंतर ते घाबरून खिलचीपूर येथील वकील दिनेश पंचोली यांच्याकडे गेले, जिथे त्यांनी यावरनोटीसवर चर्चा केली आणि कायदेशीर सल्ला घेतला. त्यानंतर वडील घरी परतले. याच दरम्यान १५ ते २० मिनिटांनी वडिलांनी हार्ट अटॅकमुळे जीव गमावला.
नोटीस मिळाल्यावर वडिलांना धक्का
शाइनने दिलेल्या माहितीनुसार, "घटस्फोटाची नोटीस मिळाल्यावर वडिलांना धक्का बसला. त्यानंतर ते लगेचच वकिलाकडे गेले. थोड्या वेळाने घरी आले, त्यांना हार्ट अटॅक आला. उपचारासाठी आम्ही त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी राजस्थानातील छिपाबारोड येथील २५ वर्षीय सद्दाम मन्सूरीशी लग्न झालं होतं."
"माझ्यावर संशय घेऊ लागला, मारहाण करू लागला"
"लग्नानंतर दोन वर्षे सर्व काही व्यवस्थित चाललं, पण नंतर गेल्या दोन वर्षांत, माझ्या पतीचे वागणं बदललं आणि तो माझ्यावर संशय घेऊ लागला. तो मला मारहाणही करू लागला. तो अनेकदा मला कोंडून ठेवत असे, मला इतरांशीही बोलण्यापासून रोखत असे, अगदी माझ्या पालकांशीही. पतीने अनेक वेळा अॅसिड टाकून जाळण्याची धमकी दिली."
"माझ्या मुलीचं काय होईल?"
"आता माझ्या मुलीचं काय होईल, जावई असं कसं करू शकतो?" अशी वडिलांना चिंता वाटत होती. या जोडप्याला दोन वर्षांचा एक मुलगा आहे. शाइनने सांगितलं की, तिच्या पतीने तिला चार महिन्यांपूर्वी घराबाहेर काढलं, तेव्हापासून ती भोजपूर येथील तिच्या वडिलांच्या घरी राहत आहे, जिथे आता घटस्फोटाची नोटीस आली होती. यानंतर कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली.