नेत्रदिपक भरारी! १५ वर्षांपूर्वी वडिलांचं निधन; आता मुलगा झाला लेफ्टनंट आणि मुलगी झाली जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:02 IST2024-12-17T18:01:53+5:302024-12-17T18:02:35+5:30
शिवांगी आणि शिवम आनंद यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.

फोटो - hindi.news18
बिहारच्या गया येथील एका कुटुंबात कौतुकास्पद घटना घडली आहे. बिहार न्यायिक सेवा परीक्षेत बहीण बिहारमध्ये ११वी आली आणि भाऊ सैन्यात लेफ्टनंट झाला. गया शहरातील नूतन नगरमधील रहिवासी शिवांगी आणि शिवम आनंद यांनी हे घवघवीत यश संपादन केलं आहे. शिवम आनंद आयएमए डेहराडूनमधून उत्तीर्ण झाला आणि लेफ्टनंट झाला आहे, तर बहीण शिवांगी जज बनली आहे. दोन्ही मुलांची निवड झाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
दोन्ही भावंडांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. १५ वर्षांपूर्वी दोन्ही मुलं लहान असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. असं असूनही त्यांनी स्वप्नं पाहणं सोडलं नाही, मेहनत सुरूच ठेवली. दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई श्वेता चौधरी आणि दोन्ही मुलं मानपूर येथील लखीबाग येथे त्यांच्या माहेरच्या घरी राहू लागले. दोघांनीही तेथूनच शिक्षण पूर्ण केलं.
शिवांगीने गया येथील नाझरेथ अकादमीमधून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतलं, त्यानंतर तिने मानव भारती, गया येथून इंटरमिजिएटचे शिक्षण घेतलं. इंटरमिजिएट केल्यानंतर शिवांगीने बनारस हिंदू विद्यापीठातून पाच वर्षांचं बीए एलएलबी आणि दोन वर्षांचं एलएलएम पूर्ण केलं. २०२४ मध्ये शिक्षण पूर्ण करताच तिने पहिल्याच प्रयत्नात बिहार न्यायिक सेवा परीक्षेत संपूर्ण बिहारमध्ये ११ वा क्रमांक पटकावला.
धाकटा भाऊ शिवम आनंद याने इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच वर्षी २०२० मध्ये त्याची एनडीएमध्ये निवड झाली. खडकवासला, पुणे येथे ३ वर्षे राहून उत्तीर्ण झाला, त्यानंतर आयएमए, डेहराडून येथे एका वर्षाच्या कठोर प्रशिक्षणानंतर १४ डिसेंबर रोजी उत्तीर्ण होऊन लेफ्टनंट झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या आईने आणि आजी-आजोबांनी त्यांची काळजी घेतली.
आई श्वेता चौधरी गया येथील चांदौटी येथील कृषी विभागाच्या जलधन विभागात कार्यरत आहेत. दोन्ही मुलांच्या यशात त्यांचे आजोबा महेश चौधरी, विजय कुमार, अजय कुमार आणि संपूर्ण माहेरच्या कुटुंबातील लोकांचं खूप सहकार्य मिळालं. कुटुंबीयांनी सांगितलं की, दोन्ही मुलांनी चांगली कामगिरी केली यापेक्षा कुटुंबासाठी महत्त्वाचं काय असू शकतं. शिवमच्या वडिलांची आठवण येत असल्याने कुटुंबीय भावूक झाले.