लव्ह मॅरेज केल्याने वडिलांनी बनवलं डेथ सर्टिफिकेट; स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी लेकीची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:58 IST2025-03-28T12:57:13+5:302025-03-28T12:58:03+5:30

मुलीने लव्ह मॅरेज केल्याने वडील संतापले आणि त्यांनी तिचं डेथ सर्टिफिकेट बनवलं.

father made death certificate of daughter after she did love marriage she wandering around to prove herself alive | लव्ह मॅरेज केल्याने वडिलांनी बनवलं डेथ सर्टिफिकेट; स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी लेकीची धडपड

प्रातिनिधिक फोटो

लव्ह मॅरेजनंतर मुलीच्या कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार करून नातेसंबंध संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये अशीच एक घटना घडली आहे. मुलीने लव्ह मॅरेज केल्याने वडील संतापले आणि त्यांनी तिचं डेथ सर्टिफिकेट बनवलं. त्यामुळे आता स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी लेकीची धडपड सुरू आहे. संजना  असं या मुलीचं नाव असून ती वणवण फिरत आहे. 

"मी संजना कुमारी आहे, मी हवेली खरगपूर ब्लॉकमधील सिंहपूर मोहल्ला येथील रहिवासी सत्तन बिंद यांची मुलगी आहे. मी माझ्या कुटुंबासह दिल्लीत राहत होते आणि याच काळात माझी भेट आनंद कुमारशी झाली. प्रेमप्रकरणामुळे आम्ही दोघेही २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घरातून पळून गेलो आणि २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दिल्ली रोहिणी कोर्टात लग्न केलं."

"बँक अकाऊंट अचानक बंद”

"माझं बँक अकाऊंट अचानक बंद झालं, तेव्हा मी त्याबद्दल चौकशी केली. मला कळलं की माझं डेथ सर्टिफिकेट हवेली खडकपूर नगरपरिषदेकडून बनवण्यात आलं आहे. जेव्हा मी माहिती घेण्यासाठी पोहोचले तेव्हा मला कळलं की, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी माझ्या वडिलांनी मला मृत दाखवून नगरपरिषद कार्यालयातून डेथ सर्टिफिकेट बनवून घेतलं होतं." 

"मी जिवंत आहे आणि मला न्याय मिळाला पाहिजे"

"मी अधिक चौकशी केली तेव्हा मला नगरपरिषद कार्यालयात माझ्या मृतदेहाचा फोटो दाखवण्यात आला. यानंतर, मी हवेली खडकपूरचे एसडीएम राजीव रोशन यांना अर्ज सादर करून न्याय मागितला आहे. ओळखपत्र दाखवून  मी पूर्णपणे निरोगी आहे आणि मला कोणताही आजार नाही किंवा मी मेलेली नाही हे सांगितलं. माझ्या वडिलांना लव्ह मॅरेजचा राग असल्याने त्यांनी हे केलं. मी जिवंत आहे आणि मला न्याय मिळाला पाहिजे" असं संजनाने म्हटलं आहे. 

“२०२४ मध्ये संजनाशी लग्न केलं”
 
संजनाचा पती आनंद कुमार म्हणाला की, "मी २०२४ मध्ये संजनाशी लग्न केलं होतं पण माझ्या पत्नीचं डेथ सर्टिफिकेट तयार करण्यात आलं आहे. त्यावर अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. माझ्या पत्नीचं डेथ सर्टिफिकेट रद्द करावं जेणेकरून ती जिवंत असल्याचं सिद्ध होईल."

Web Title: father made death certificate of daughter after she did love marriage she wandering around to prove herself alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.