आश्चर्यकारक योगायोग... वडील परेड कमांडर, मुलाने कर्तव्य पथावर केले ६१ घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 19:47 IST2025-01-26T19:46:21+5:302025-01-26T19:47:29+5:30
भारताच्या प्रजासत्ताक दिनी परेडदरम्यान पिता-पुत्राचा एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला.

आश्चर्यकारक योगायोग... वडील परेड कमांडर, मुलाने कर्तव्य पथावर केले ६१ घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्व
Independence Day 2025: भारत आज २६ जानेवारी २०२५ रोजी आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथम राष्ट्रपती मुर्मू यांनी तिरंगा फडकावला आणि त्यानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजाला सलामी दिली. यावेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आज एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले.
भारताच्या प्रजासत्ताक दिनी परेडदरम्यान पिता-पुत्राचा एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. लेफ्टनंट अहन कुमार यांनी ६१ व्या घोडदळाचे नेतृत्व केले तर त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल भवनेश कुमार परेड कमांडर होते. या दुर्मिळ घटनेने कुटुंबांमध्ये चालू असलेल्या लष्करी परंपरेला उजाळा दिला. लेफ्टनंट अहान कुमार यांनी परेडमधील कर्तव्याच्या मार्गावर ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आपल्या हॅनोव्हेरियन रणवीर या प्रतिष्ठित घोड्यावर ६१ घोडदळ दलाचे नेतृत्व केले.
लेफ्टनंट अहन कुमार या तरुण अधिकाऱ्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता. कारण त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार हे दिल्ली एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग परेड कमांडर आहेत. अहान यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कर्तव्य पथावर आयोजित केलेल्या परेडमध्ये अहान यांनी आपल्या कुटुंबाची लष्करी परंपरा आणि सन्मान पुढे नेण्याची ही पहिलीच वेळ आहे. अहान यांनी नेहमीच त्यांचे वडील आणि आजोबा यांना आदर्श मानले आहे. अहान यांचे आजोबा आणि त्यांच्या आईचे वडील यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घेतला होता.
दरम्यान, अहान यांनी ज्या घोडदळाचे नेतृत्व केले होते ते १९५३ मध्ये तयार झाले होते. ही तुकडी जयपूर येथे स्थित आहे आणि म्हैसूर लान्सर्स, जोधपूर लान्सर्स आणि ग्वाल्हेर लान्सर्स यासारख्या अनेक संस्थानिक सैन्याच्या विलीनीकरणानंतर तयार करण्यात आली. या घोडदळ मोहिमेचे नेतृत्व करण्याचा अनोखा गौरव अहान यांना मिळाला होता. यामध्ये १५ व्या इम्पीरियल कॅव्हलरी ब्रिगेडच्या तुकडीने टर्कीच्या आठव्या सैन्याचा पराभव केला होता. त्यावेळी २३ सप्टेंबर १९१८ रोजी हैफा हे मोक्याचे बंदर ताब्यात घेण्यात आले. हा दिवस आज भारत आणि इस्रायलमध्ये हैफा दिवस म्हणून साजरा केला जातो. नवी दिल्लीतील हैफा चौकातील तीन पुतळे या प्रतिष्ठित युनिटचे सैनिक आणि घोड्यांच्या शौर्याचा पुरावा आहेत, ज्यांनी ३९ युद्ध सन्मान जिंकले आहेत.