हृदयद्रावक! आनंदात लेकाची वरात घेऊन आले वडील, अंधारात अचानक पाय घसरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 12:39 IST2024-03-03T12:33:03+5:302024-03-03T12:39:35+5:30
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

फोटो - hindi.news18
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील बसेरी पोलीस स्टेशन परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोठ्या आनंदात आपल्या लेकाच्या लग्नाची वरात घेऊन आलेल्या वडिलांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच लग्नघरात गोंधळ उडाला. पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या घटनेची माहिती मिळताच सर्वांना धक्काच बसला.
महुआचे रहिवासी गोपाल सिंह, मृताचे मेहुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी समय सिंह (55) हे मुलगा रोहितच्या लग्नाच्या वरातीसह बसेरीच्या मूला बौहरे गावात आला होता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर नवरदेवाचे वडील समय सिंह बसच्या दिशेने परतत होते. दृष्टी थोडी कमी असल्याने अंधारात त्यांचा अचानक पाय घसरला. यामुळे ते जवळच असलेल्या कालव्यात पडले.
पावसामुळे माती निसरडी झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. नवरदेवाचे वडील कालव्यात पडल्याची घटना समजताच लग्नघरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी कालव्याच्या काठी त्याचा शोध घेतला मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. याबाबत तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन करत त्यांना बाहेर काढलं.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये उपस्थित असलेले कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, समय सिंह यांना कालव्यातून बाहेर काढल्यानंतर सीपीआरही देण्यात आला होता, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. रविवारी सकाळी सिंह यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.