Election Commission SIR: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या योजनेचे काम बूथ लेव्हल ऑफिसर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किती जीवघेणे ठरत आहे, याचे भीषण वास्तव समोर आले आहे. एकाच दिवशी देशातील दोन राज्यांमध्ये, जयपूर आणि केरळमध्ये एसआयआरच्या कामाच्या असह्य तणावातून दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे देशभरातील बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआरशी संबंधित कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
सुपरवायझरच्या धमक्या आणि रेल्वेखाली उडी
जयपूरमध्ये, बिंदायका रेल्वे फाटकाजवळ एका सरकारी शिक्षकाने ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. मृतक मुकेश जांगिड हे कालवाड़, धर्मपुरा येथील रहिवासी होते. जांगिड हे राजकीय प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमागे एसआयआर योजनेच्या कामाचा प्रचंड ताण कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. मुकेश जांगिड यांच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, एसआयआरच्या कामामुळे ते अत्यंत त्रस्त होते. त्यांचे सुपरवायझर सीताराम त्यांच्यावर काम पूर्ण करण्यासाठी सतत दबाव टाकत होते आणि निलंबित करण्याची धमकी देत होते. याच मानसिक त्रासातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. मृतकाच्या भावानेही मुकेश गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात असल्याचे सांगितले .
केरळमध्येही कामाच्या तणावाने आत्महत्या
दुसरीकडे, केरळच्या कन्नूरमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका सरकारी शाळेतील स्टाफ आणि बीएलओ असलेले अनीश जॉर्ज यांनी रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, अनीश यांनी एसआयआर प्रक्रियेशी संबंधित कामाचा ताण आणि लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दबावातून हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेच्या निषेधार्थ, केरळमधील बीएलओंनी सोमवारी कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. २३ वर्षांपूर्वीच्या मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी बीएलओ कर्मचाऱ्यांवर रात्रंदिवस काम करण्याची सक्ती केली जात आहे, तर त्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाहीये, असं कर्मचारी संघटनांचा आरोप आहे.
Web Summary : Two government employees in Jaipur and Kerala died by suicide due to unbearable pressure from election-related duties. Supervisors' threats and excessive workload were cited as reasons, sparking outrage and calls for boycotts.
Web Summary : जयपुर और केरल में चुनाव संबंधी ड्यूटी के असहनीय दबाव के कारण दो सरकारी कर्मचारियों ने आत्महत्या कर ली। पर्यवेक्षकों की धमकियों और अत्यधिक कार्यभार को कारण बताया गया, जिससे आक्रोश फैल गया और बहिष्कार का आह्वान किया गया।