'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:19 IST2022-11-20T15:16:39+5:302022-11-20T15:19:05+5:30
'भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.'

'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला
श्रीनगर:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी एका सभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, 'कोणताही धर्म वाईट नसतो, माणसं वाईट असतात. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी ते 'हिंदू धोक्यात आहे' असे म्हणतात. भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.'
कोणताच धर्म वाईट नसतो
जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित अब्दुल्ला यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. 'ते म्हणतील की हिंदूंना धोका आहे, पण तुम्ही त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. कोणताही धर्म वाईट नसतो, फक्त माणसं वाईट असतात.' या सभेत त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, 'मी कधीही पाकिस्तानशी हातमिळवणी केली नाही. नॅशनल कॉन्फरन्सने कधीही पाकिस्तानची बाजू घेतली नाही. जिन्ना माझ्या वडिलांना भेटायला आले होते, पण आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.'
भगवान राम फक्त हिंदूंचे नाहीत
ते पुढे म्हणतात की, 'भगवान राम हे सर्वांचे आहेत, केवळ हिंदू धर्माच्या लोकांचे नाहीत. आम्हाला 50 हजार नोकऱ्या देऊ, असे आश्वासन केंद्राने दिले होते, ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आमची मुले सर्व बेरोजगार आहेत. पण, तुमच्यासाठी फक्त निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख पुन्हा एकदा एकत्र होतील,' असंही अब्दुल्ला यावेळी म्हणाले.