आता ४ लाख नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर्सची निघणार रॅली; राकेश टिकैत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 21:42 IST2021-02-09T21:40:55+5:302021-02-09T21:42:50+5:30
शेतकरी आंदोलन आता देशव्यापी होणार, टिकैत यांचं वक्तव्य

आता ४ लाख नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर्सची निघणार रॅली; राकेश टिकैत यांचा इशारा
कुरूक्षेत्रातील पिहोवा येथे मंगळवारी बोलावण्यात आलेल्या किसान महापंचायतमध्ये शेतकऱ्यांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी आंदोलन हे पुढेही सुरू राहणार असल्याचं सांगत ते आता संपूर्ण देशात पसरणार असल्याचं म्हटलं. तसंच आता ४ लाख नाही तर ४० लाख ट्रॅक्टर्सची रॅली निघणार असल्याचं ते म्हणाले.
महापंचायतीमध्ये टिकैत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच या आंदोलनाची व्याप्ती आता वाढून संपूर्ण देशात परसणार असल्याचं म्हटलं. महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांनी आजतक या वाहिनीशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरही निशाणा साधला. "पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आयुष्यात कधीही आंदोलन केलं नाही. त्यांनी देश तोडण्याचं काम केलं आहे. तर त्यांना आंदोलन करणाऱ्या आंदोलनजीवींबद्दल काय माहित असेल. आंदोलन तर शहीद भगत सिंग यांनीही केलं. इतकंच नाही तर लालकृष्ण अडवाणी यांनीही केलं. परंतु पंतप्रधानांनी कोणतंही आंदोलन केलं नाही," असं टिकैत म्हणाले.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत तरी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहेत. परंतु यानंतही आंदोलन थांबणार नाही. परंतु आता शेतकरी बदलून बदलून आंदोलनाच्या जागेवर पोहोचतील. आंदोलनाची व्याप्ती आता संपूर्ण देशात पसरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांना किसान पंचायत केवळ हरयाणात का भरवण्यात येते असा सवाल करण्यात आला. परंतु यावेली त्यांनी हरयाणात पंचायत भरवण्यास मनाई आहे का असा पुन्हा सवाल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चेसाठी तयार असतील तर आम्हीही तयार आहोत. पण आमचा पंचही तिकडेच आहे आणि मंचही. त्यांनी हे कायदे मागे घेऊन एमएसपीवर कायदे तयार केले पाहिजेत," असंही टिकैत यांनी नमूद केलं.