कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 07:28 IST2020-12-03T00:38:29+5:302020-12-03T07:28:10+5:30
केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; ५ डिसेंबरला प्रतिमा दहन!
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले.
केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाविषयी गंभीर नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देण्याचा उपक्रम घेतला आहे. गुरुवारी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले जाईल. शेतीविषयक कायदे मागे घ्या अन्यथा होणाऱ्या उद्रेकास केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी ताकीद या निवेदनाद्वारे दिली जाणार आहे. या आंदोलनात ४५० संघटना एकसंघ आहेत. कोणीही दिशाभूल करणार असेल तर त्यांना ‘सरळ’ करा असा इशारा देत आपण जराही विचलित होणार नाही, याची काळजी घेऊ असे आवाहन दर्शन पाल (पंजाब), शिवकुमार कक्काजी (मध्य प्रदेश), जगजीतसिंह दल्लेवाल (पंजाब), गुरनामसिंग चडोनी (हरियाणा), मेधा पाटकर (महाराष्ट्र), योगेंद्र यादव (हरियाणा), रणजीत राजू (राजस्थान), प्रतिभा शिंदे (महाराष्ट्र), अक्षय कुमार (ओडिशा), के. व्ही. बिजू (केरळ), हरपाल चौधरी (उत्तरप्रदेश), कविता कुरुगंते (कर्नाटक) आदींनी केले आहे.
५ डिसेंबरला प्रतिमा दहन!
शेतकरी संघटनांनी ५ डिसेंबर रोजी देशभरात सगळ्याच गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या प्रतिमांचे दहन करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना स्थानिक शेतकरी नेत्यांना देण्यात आल्या आहेत.