"साहेब... शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तर किमान एक हेलिकॉप्टर तरी द्या", शेतकऱ्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:32 IST2025-02-26T13:32:22+5:302025-02-26T13:32:39+5:30
एका तरुण शेतकऱ्याने सुनावणीदरम्यान कलेक्टरना एक अनोखी विनंती केली आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने सुनावणीदरम्यान कलेक्टरना एक अनोखी विनंती केली आहे. त्याने त्याच्या शेतात जाण्यासाठी प्रशासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली.
जिल्ह्यातील सरजना गावातील रहिवासी असलेला तरुण शेतकरी संदीप पाटीदार याने जनसुनावणीत विनंती केली की, गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या शेतात जाण्याचा रस्ता गुंडांनी रोखला आहे. शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही. कनिष्ठ न्यायालयानेही जुना रस्ता सुरू करण्याचा आदेश दिला होता, परंतु तहसीलदार आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत.
शेतकरी संदीप पाटीदार म्हणाला की, "मी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन शेताकडे जाणारा रस्ता सुरू करत नाही. मी अनेक वेळा याबाबत विनंती केली आहे. जर प्रशासनाने मला हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं तर मी माझ्या शेतात जाऊ शकेन. माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही."
"माझं शेत गेल्या १० वर्षांपासून तसंच पडून राहिलं आहे. साहेब... शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तर किमान एक हेलिकॉप्टर तरी द्या." या प्रकरणात कलेक्टर हिमांशू चंद्रा यांनी ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे. शेतकऱ्याची मूळ मागणी शेताच्या रस्त्याबाबत आहे. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. यावर स्थगिती आहे. तरीही आम्ही रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आहे.