३६० किलो स्फोटकांनंतर आता AK-74 रायफल; महिला डॉक्टरच्या कारमध्ये शस्त्रे सापडल्याने मोठा 'ट्विस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:44 IST2025-11-10T14:39:26+5:302025-11-10T14:44:34+5:30
हरियाणात दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

३६० किलो स्फोटकांनंतर आता AK-74 रायफल; महिला डॉक्टरच्या कारमध्ये शस्त्रे सापडल्याने मोठा 'ट्विस्ट'
Faridabad Explosives Recovery Case: दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबाद शहरात एका डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके सापडल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांनी एका महिला डॉक्टरच्या कारमधून एक असॉल्ट रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कार फरिदाबादच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. मुझम्मिल शकील याच्या एका सहकाऱ्याच्या नावावर आहे. डॉ. शकील यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली. या चौकशीदरम्यान शकीलने एका भाड्याच्या खोलीची माहिती दिली जिथे ३६० किलो स्फोटके,२० टायमर आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत, अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉक्टर मुजम्मिल शकील याला अटक करण्यात आली. पुलवामाचा रहिवासी असलेला डॉ. शकील याच युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये राहत होता. त्याची चौकशी सुरू असतानाच, तपास यंत्रणांना त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या नावावर असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारची तपासणी केली. या तपासणीत कारमधून एक क्रिंकोव्ह असॉल्ट रायफल (एके-७४), पिस्तूल, तीन मॅगझीनसह ८३ जिवंत राऊंड आणि पिस्तूलचे ८ जिवंत राऊंड असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
३६० किलो स्फोटकांचा साठा आणि जैश कनेक्शन
डॉक्टर शकीलच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी फरिदाबादच्या धौज भागात त्याने भाड्याने घेतलेल्या एका खोलीवर छापा टाकला. या खोलीत आठ मोठ्या आणि चार छोट्या सूटकेसमध्ये तब्बल ३६० किलोहून अधिक अमोनियम नायट्रेट लपवून ठेवण्यात आले होते. याशिवाय, स्फोट घडवण्यासाठी वापरले जाणारे २० टाइमर आणि २० बॅटरी देखील सापडल्या. डॉ. मुजम्मिल शकील याचे थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच हा स्फोटकांचाा साठा डॉ. शकीलपर्यंत पोहोचला होता.
महिला डॉक्टरची भूमिका आणि तपासावर प्रश्नचिन्ह
सध्या ही महिला डॉक्टर पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे, कारण तिची कार दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात होती. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके राजधानी दिल्लीच्या इतक्या जवळ कशासाठी जमा करण्यात आली आणि सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून हा साठा कसा वाचला, याबाबत तपास सुरू आहे. हरियाणा पोलिसांनी डॉ. मुजम्मिल शकील आणि अनंतनागचा डॉक्टर आदिल अहमद या दोन दहशतवादी डॉक्टरांना अटक केली आहे.