"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:38 IST2025-12-21T19:35:39+5:302025-12-21T19:38:31+5:30
"जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?"

"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्नाचे वय तसेच, देशाच्या लोकसंख्या धोरणासंदर्भात मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे. "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नाही, तर ते समाजाचे एक महत्त्वाचे युनिट आहे. जर तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल, तर ते योग्य नाही," अशा शब्दांत भागवत यांनी लिव्ह-इन संस्कृतीसंदर्भात भाष्य केले.
भागवत म्हणाले, कुटंबच आपल्याला समाजात कसे रहावे, हे शिकवते. हे सर्व आपला देश, समाज आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्याचे साधन आहे. जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?"
तीन मुले असल्यास... -
भागवत पुढे म्हणाले, मी डॉक्टर वैगेरे मंडळींशी चर्चा करून काही माहिती घेतली. जर लग्न १९ ते २५ वर्षांदरम्यान झाले आणि दाम्पत्याला तीन मुले असतील, तर माता-पिता आणि मुलांचे आरोग्य उत्तम राहते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार, तीन मुले असल्यास मुलांमध्ये अहंकार व्यवस्थापन (Ego Management) विकसित होण्यास मदत होते. लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत ते म्हणाले की, जर जन्मदर २.१ च्या खाली गेला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो. सध्या बिहारमुळे आपला दर २.१ वर असून अन्य राज्यांत तो १.९ पर्यंत खाली आला आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: RSS Chief Mohan Bhagwat says, "...Regarding the concept of live-in relationships. You're not ready to take responsibility. This isn't right. The family, marriage, is not just a means of physical satisfaction. It's a unit of society. The family is… pic.twitter.com/Go4WIw5KS3
— ANI (@ANI) December 21, 2025
५० वर्षांच्या नियोजनाची गरज -
लोकसंख्या हे केवळ ओझे नसून ती एक प्रकारची संपत्तीही आहे. प्रभावी लोकसंख्या धोरण बनवणे आवश्यक आहे. देशाचे पर्यावरण, पायाभूत सुविधा, महिलांचे आरोग्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या अंदाजावर आधारित सर्वसमावेशक धोरण आखले जायला हवे. "मी स्वतः अविवाहित प्रचारक असल्याने मला यातील तांत्रिक माहिती नाही, मात्र तज्ज्ञांकडून मिळालेली ही माहिती समाजाच्या हितासाठी महत्त्वाची आहे," असेही भागवत यांनी म्हटले आहे.