सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:35 IST2025-06-18T16:34:56+5:302025-06-18T16:35:53+5:30
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फैजल खान सर यांची भेट घेतली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्लास घेणारे फैजल खान हे शिक्षक सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणावरील आणि काही जुनी माहिती सांगणारे रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल आहेत. सध्या ते बिहारमधील विधान विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी खान सर यांची भेट घेतली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी पाटणा येथे पोहोचलेल्या संजय सिंह यांनी जाहीर केले की, आगामी बिहार निवडणुकीत 'आप' सर्व २४३ विधानसभा जागा लढवेल. त्यानंतर ते खान सरांच्या कोचिंग सेंटरमध्ये जाऊन त्यांना भेटले. बिहारच्या शिक्षण व्यवस्थेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर खान सर विधानसभा निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
पाटण्याचे प्रसिद्ध कोचिंग शिक्षक फैजल खान उर्फ खान सर हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या वर्षी बिहार लोकसेवा आयोग परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या आरोपावरून पाटण्यात आंदोलन करण्यात आले. खान सरांनीही यामध्ये सक्रिय भूमिका बजावली. ते गरदानी बाग येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अनेक वेळा दिसले.
यापूर्वीही खान सर राजकारणात येण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी अनेकदा याचा इन्कार केला आहे. आता बिहार निवडणुकीपूर्वी 'आप'च्या संजय सिंह यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
बिहारमधील सर्व २४३ जागा आप लढणार
आम आदमी पक्ष यावेळी बिहारमध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाने सर्व २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संजय सिंह मंगळवारी पाटणा येथे पोहोचले. त्यांनी गरदानीबाग येथे पक्षाच्या निषेधात भाग घेतला. दिल्लीतील बिहारी लोकांच्या झोपडपट्ट्या पाडल्याच्या निषेधार्थ आपने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.