फेसबुक, ट्विटरचे सरकारशी संगनमत; सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:31 IST2022-03-17T06:30:44+5:302022-03-17T06:31:01+5:30
सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली.

फेसबुक, ट्विटरचे सरकारशी संगनमत; सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सत्तारूढ पक्ष आणि संबंधित संघटनांशी संगनमत करून फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडिया लोकशाहीचे अपहरण करीत आहे. लोकशाही आणि देशासाठी धोकादायक असे राजकीय वातावरण देशात निर्माण करण्याचे काम करीत आहे, असा परखड आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केला.
सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली. सोशल मीडियाचा वापर लोकशाहीचे अपहरण करण्यासाठी केला जात आहे. देशातील निवडणूक राजकारणावर सोशल मीडिया कंपन्यांचा प्रभाव लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या.
लोकसभेत बोलताना त्यांनी भाजपचा थेट नामोल्लेख केला नाही; परंतु त्यांचा इशारा मोदी सरकारकडेच होता. त्या म्हणाल्या की, सरकारच्या इशाऱ्यावर फेसबुक आणि ट्विटर देशात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.
दुसऱ्या पक्षांना मात्र समान संधी दिली जात नाही. फेसबुक आपल्याच नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. अल् जजिरा आणि वॉलस्ट्रीट जर्नलचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, द्वेष निर्माण करणारे संदेश आणि पोस्टवर अंकुश लावण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. समाजात फूट पाडणे, वैमनस्य, द्वेष निर्माण केले जात आहे.
पराभवाची होणार कारणमीमांसा
पाच राज्यांतील पराभवाची कारणमीमांसा व कोणते संघटनात्मक बदल करावेत याची जबाबदारी ५ नेत्यांवर.
गोवा : रजनी पाटील, मणिपूर : जयराम रमेश
पंजाब : अजय माकन, उत्तर प्रदेश : जितेंद्रसिंह
उत्तराखंड : अविनाश पांडे