तिरुअनंतपुरम : ब्रिटिश रॉयल नेव्हीचे लढाऊ विमान F-35 गेल्या अनेक दिवसांपासून भारतात अडकून पडले आहे. केरळ किनारपट्टीपासून सुमरे 100 नॉटिकल मैल अंतरावर युद्धाभ्यास करणाऱ्या या विमानाची 14 जून रोजी खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे तिरुअनंतपुरम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. आता 19 दिवसांनंतरही या विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात यश आले नाही. त्यामुळेच या विमानाची पार्ट्स वेगळे करुन ब्रिटनला परत घेऊन जाण्याची योजना आहे.
एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचा भाग असलेले ब्रिटिश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F-35 फायटर जेट सुमारे 110 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 950 कोटी रुपये) किमतीचे हे पाचव्या पिढीतील स्टील्थ जेट आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या विमानाने केरळच्या किनार्यापासून सुमारे 100 सागरी मैल दूर असलेल्या ब्रिटिश विमानवाहू नौकेवरून उड्डाण केले होते. खराब हवामान आणि इंधन कमी झाल्याने त्याला तिरुवनंतपुरममध्ये उतरवण्यात आले.
विमानात काय बिघाड झाला?सुरुवातीला इंधनाची कमतरता हे आपत्कालीन लँडिंगचे कारण सांगितले जात होते, परंतु नंतर असे समोर आले की, विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड होता. अनेक प्रयत्नांनंतरही हे विमान अद्याप उड्डाण करण्यास सक्षम झालेले नाही. तांत्रिक बिघाड ठीक करण्यासाठी ब्रिटीश नेव्हीने इंजिनिअर्सची टीम भारतात पाठविली होती, मात्र त्यांनाही विमानातील बिघाड ठीक करता आला नाही. त्यामुळेच आता या विमानाचे भाग वेगळे करुन ब्रिटनला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे ब्रिटिश जेट सध्या तिरुवनंतपुरम विमानतळावर उभे असून, त्याची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान करत आहेत.