VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:01 IST2025-11-11T10:00:12+5:302025-11-11T10:01:44+5:30
Delhi Blast CCTV: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या घटनेमुळे अनेक ...

VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
Delhi Blast CCTV: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या घटनेमुळे अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कशीही त्याचा संबंध असल्याचे दिसून येत आहे. तपास संस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालात या स्फोटात उच्च दर्जाचे स्फोटक, अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले होते. पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई आय२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आ. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक संशयित आत बसलेला दिसत आहे.
लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत पुलवामा येथील एका रहिवाशाचा शोध लागला आहे, ज्याने २९ ऑक्टोबर रोजी स्फोट घडवून आणणारी हुंडई आय२० कार खरेदी केली होती. तपासकर्त्यांनी अद्याप त्याची ओळख सार्वजनिक केलेली नसली तरी तो ३४ वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर काही तासांत, पोलिसांनी गुडगाव येथील एका रहिवाशाची चौकशी केली ज्याच्या नावावर ही कार होती. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने ती गाडी दुसऱ्या कोणाला तरी विकली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सध्याचा मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन वेळा ही कार विकली गेली आणि शेवटी ती काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवाशाकडे गेली.
प्राथमिक तपासात स्फोट झालेली कार लाल किल्ल्याजवळ तीन तासांहून अधिक काळ उभी होती आणि त्यानंतर ती बाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमवारी दुपारी ३:१९ वाजता लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कार प्रवेश करत असल्याचे आणि सायंकाळी ६:४८ वाजता बाहेर पडताना दिसून आले आहे. कार पार्किंगमधून बाहेर पडली तेव्हा प्रचंड वाहतूक होती. दर्या गंज, लाल किल्ला परिसर, कश्मीरी गेट आणि सुनेहरी मशिदीजवळही ही कार दिसली होती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये, HR 26CE7674 क्रमांकाची गाडी दुपारी ३:१९ वाजता लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. ती संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत तिथेच उभी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक एकदाही गाडीतून बाहेर पडला नाही. तो गाडीच्या आतच बसून राहिला. पोलिसांनी एका मिनिटाचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवला आहे ज्यामध्ये कार बदरपूर सीमेवरून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर हात खिडकीतून बाहेर काढताना दिसत आहे. तो निळा आणि काळा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. पोलिस आता कारच्या संपूर्ण मार्गाची चौकशी करत आहेत. पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती पार्किंग स्लिप घेत असल्याचे दिसत आहे.
VIDEO | Delhi: CCTV visuals of the suspect and the car involved in the blast near Red Fort Metro Station, Chandni Chowk.
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2025
The blast, which occurred yesterday around 7 PM, claimed at least 9 lives and injured several others.#DelhiBlast#ChandniChowk#SecurityUpdate
(Source -… pic.twitter.com/NatPc37vSa
दुसरीकडे, या घटनेनंतर, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले होते की कारमध्ये अनेक प्रवासी होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच व्यक्ती दिसत होती, परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की ते नंतर त्याच्यासोबत आणखी कोणी सामील झाले की नाही याचा तपास करत आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरीदाबादमधील दोन निवासी इमारतींमधून सुमारे ३५० किलो स्फोटके जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा स्फोट झाला. दिल्ली पोलिस या दोन्ही घडामोडींमध्ये काही संबंध आहे का याचा तपास करत आहेत.
दरम्यान, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ संध्याकाळी ६:५२ वाजता हा शक्तिशाली स्फोट झाला. कारचे तुकडे झाले, मृतदेह आणि शरीराचे अवयव सर्वत्र विखुरले गेले. काही मिनिटांतच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. सर्व जखमींना एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आले.