चकमकीनंतर स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 06:19 IST2020-04-12T05:51:01+5:302020-04-12T06:19:16+5:30
काश्मिरात अतिरेक्यांचा शोध सुरू

चकमकीनंतर स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी लाईट मशीनगन व आयईडी स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.दक्षिण काश्मीरमधील नंदीमार्ग भागातील दमहाल हांजीपुरा येथे काही घरांची घेराबंदी करण्यात आली व शोधसत्र हाती घेण्यात आले होते. याठिकाणी अतिरेकी दडले असल्याची गुप्त खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.
सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमकीला तोंड फुटले. सुरुवातीला गोळीबार केल्यानंतर अतिरेकी घटनास्थळाहून पळून गेले. आता अतिरेक्यांना शोधण्यासाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिरेकी दडल्याचा संशय असलेल्या घरांची घेराबंदी करताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. याचा फायदा घेत ते पळून गेले असावेत. अतिरेकी दडलेल्यांपैकी एका घरात लाईट मशीनगन व स्फोटके बनविण्याचे साहित्य आढळले. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.