नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:07 IST2025-02-12T09:06:27+5:302025-02-12T09:07:04+5:30
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...
जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सुमारे ३.३० च्या सुमारास जम्मू जिल्ह्यातील खौर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केरी बट्टल भागात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. त्यात तीन जवान जखमी झाले. या जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे यापैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.
याबाबचत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन करमजित सिंग बख्शी यांच्या नेतृ्त्वाखाली लष्कराचं पथक या परिसरात गस्त घालत होतं. त्यादरम्यान, रिमोट कंट्रोल डिव्हाईसमधून आयईडीचा स्फोट झाला.
दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील तारांच्या कुंपणाजवळ आयईडी लावून ठेवले होते. तसेच रिमोट कंट्रोल डिव्हाईसच्या माध्यमातून त्यात स्फोट घडवण्यात आला. त्यात हे तीन जवान गंभीर जखमी झाले. पैकी दोधांचा मृत्यू झाला. या दोन्ही जवानांचं १८ एप्रिल रोजी लग्न होणार होतं. कॅप्टन करमजित सिंग बख्शी झारखंडमधील रहिवासी होते. तसेच त्यांचा विवाह १८ एप्रिल रोजी होणार होता. त्यांची होणारी पत्नी लष्करामध्ये डॉक्टर आहे.तर नायक मुकेश सिंह मन्हास हे जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचाही साखरपुडा झाला होता. तसेच १८ एप्रिल रोजी त्यांचं लग्न होणार होतं.
दरम्यान, या स्फोटानंतर अखनूरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीच सापडलं नाही. दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ आयईडी लावल्यानंतर पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पळून गेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.