पाकिस्तान वगळता सर्व शेजारी देश आमच्यावर खूश, तालिबान मंत्र्यांने भारतातून दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:05 IST2025-10-14T11:47:47+5:302025-10-14T12:05:24+5:30
पाकिस्तानने तालिबान राजवटीवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. अनेक हल्ल्यांसाठी या गटाला जबाबदार धरले आहे.

पाकिस्तान वगळता सर्व शेजारी देश आमच्यावर खूश, तालिबान मंत्र्यांने भारतातून दिला इशारा
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी सोमवारी भारतातून पाकिस्तानला इशारा दिला. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित झाली आहे आणि त्यांचा देशाला कोणत्याही राष्ट्राशी संघर्ष नको आहे, असेही मुक्ताकी म्हणाले. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या सीमा संघर्षांवरही भाष्य केले. फक्त एक पाकिस्तान वळगता अफगाणिस्तानचे इतर पाच शेजारी देश आहेत आणि ते सर्व त्यांच्याशी आनंदी आहेत, असेही ते म्हणाले.
"आम्हाला कोणाशीही संघर्ष नको आहे. अफगाणिस्तानात शांतता आहे. पाकिस्तान हा आमचा एकमेव शेजारी नाही. आमचे पाच इतर शेजारी आहेत. सर्वजण आमच्यावर खूश आहेत," असंही मुक्ताकी म्हणाले. जर त्यांना शांतता नको असेल तर काबुलकडे अन्य पर्याय आहेत, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.
काही दिवसापूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर चकमक झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. गुरुवारी काबुलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंमधील संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे.
दोन्ही देशातील परिस्थिती नियंत्रणात
सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मुत्ताकी म्हणाले की, एकूणच परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यांचा देश आपल्या सार्वभौमत्वाचे कोणतेही उल्लंघन सहन करणार नाही. पाकिस्तानच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून, अफगाणिस्तानच्या सैन्याने शनिवारी रात्री दोन्ही शेजारी देशांच्या सीमेवरील अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला. यामुळे व्यापक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली.
"अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे धोरण सर्व समस्या संवादाद्वारे सोडवणे आहे. आम्हाला कोणताही तणाव नको आहे आणि जर त्यांना ते नको असेल तर अफगाणिस्तानकडे इतर पर्याय आहेत, असे पाकिस्तानला दिलेल्या स्पष्ट संदेशात मुत्ताकी म्हणाले.