'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 07:52 IST2025-09-16T07:52:09+5:302025-09-16T07:52:48+5:30
तडाखा बसलेल्या पंजाबमधील भागाचा केला दौरा;

'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
चंडीगड : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंजाबमधील अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेट दिली. तसेच तेथील पीडितांची त्यांनी विचारपूस केली. पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी अमृतसरमध्ये दाखल झाल्यानंतर अजनालामधील घोनेवाल गावाला भेट दिली. या गावाला काही दिवसांपूर्वी पुराचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती गांधी यांनी माहिती घेतली व स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली. पुरामुळे हानी झालेल्या घरांचीही पाहणी केली.
पंजाबमध्ये जीवित आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, लोकांना मदत शिबिरात राहावे लागत आहे. या कठीण काळात प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता तुमच्यासोबत आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सर्वांनी शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुराने शेती गेली वाहून
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यानंतर गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक परिसरातील पूरग्रस्त गुरचाक गावालाही भेट दिली.
तिथे त्यांनी पुराच्या पाण्याने नासाडी झालेल्या शेतजमिनींची पाहणी केली. पंजाबमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
दमदार, मुसळधार बरसून मान्सून परतीच्या प्रवासावर
नवी दिल्ली : उत्तर भारतात दमदार, इतरत्र बहुतांश भागांत मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून पाऊस परतला असून, दोन-तीन दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून परतण्यास स्थिती अनुकूल आहे.