"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:39 IST2025-09-17T15:38:27+5:302025-09-17T15:39:23+5:30
"जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंची खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा आपल्याच देशात राहतो. तो परदेशात जात नाही. तोच पैसा पुन्हा देशाच्या विकासात कामी येतो. "

"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणउत्सवांपूर्वीच पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वापरण्याचा आग्रह केला. यावेळी स्वदेशी वापराचा देशाला काय फायदा होईल? यासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. एवढेत नाही तर, प्रत्येक दुकानावर 'गर्व से कहो, यह स्वदेशी है',असे बोर्ड लागायला हवेत, असेही ते म्हणाले. ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आज मध्य प्रदेशातील धार येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा सणउत्सवांचा काळ आहे. आपण स्वदेशीचा मंत्र सातत्याने उच्चारायला हवा. तो तुमच्या जीवनाचा भाग व्हायला हवा. मी करबद्ध विनंती करतो की, तुम्ही जे काही खरेदी कराल, ते भारतात बनलेले असावे. तुम्ही जे काही खरेदी करता त्यासाठी कुण्यातरी भारतीयांचा घाम लागलेला असावा. तुम्ही जे काही खरेदी कराल,त्याला भारतीय मातीचा सुगंध असावा. मी व्यापाऱ्यांना देशासाठी मला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे कारण मला २०२७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे आणि त्याकडे जाण्यारा मार्ग आत्मनिर्भर भारतातून जातो."
स्वदेशी खरेदीचे फायदे -
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी खरेदीचे काही फायदेही सांगितले. ते म्हणाले, "जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंची खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा आपल्याच देशात राहतो. तो परदेशात जात नाही. तोच पैसा पुन्हा देशाच्या विकासात कामी येतो. याच पैशांपासून रस्ते तायार होतात. गावांत शाळा तयार होतात, तसेच हाच पैसा गरीब कल्याणच्या योजना राबवताना कामी येतो. मध्यम वर्गाच्या स्वप्नपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर धनाची आवश्यककता असते. हे सर्व आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून साध्य करू शकतो. जेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू आपल्याच देशात तयार होतात, तेव्हा रोजगार निर्मिती होते."
मोदी पुढे म्हणाले, आता २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. तेव्हा आपण केवळ स्वदेशी उत्पादनेच खरेदी करायला हवीत. आपण एक मंत्र लक्षात ठेवायला हवा. तो प्रत्येक दुकानावर लिहिलेला असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. मी राज्य सरकारला एक मोहीम सुरू करण्याचा आग्रह करेन, प्रत्येक दुकानावर एक बोर्ड असावा - "गर्वसे कहो, यह स्वदेशी है."