जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठका घेतल्या. सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती, ही मुदत आता संपली आहे. यानंतरही केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आली होती. पण, आता पुन्हा मुदत वाढवली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईनंतर सहा दिवसात ५५ राजदूत आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासह ७८६ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारताबाहेर पडले आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यासह पाकिस्तानी व्हिसा असलेले आठ जण पाकिस्तानमध्ये गेले आहेत.
भारतानं एअरस्पेस बंद केल्याने पाकिस्तानला मोठा फटका; 'या' देशांमध्ये जाण्यासाठी लागणार आणखी वेळ
२४ एप्रिलपासून, २५ राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण १,४६५ भारतीय पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात आले आहेत. याशिवाय, दीर्घकालीन भारतीय व्हिसा असलेले १५१ पाकिस्तानी नागरिकही भारतात आले आहेत.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 'भारत सोडा' नोटीस बजावली होती.
शेवटची तारीख २९ एप्रिल होती
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल होती. वैद्यकीय व्हिसा धारकांसाठी देश सोडण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल होती. इतर १२ श्रेणीतील व्हिसा धारकांसाठी देश सोडण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल होती. या श्रेणींमध्ये आगमनानंतरचा व्हिसा आणि व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, तीर्थयात्री आणि गट तीर्थयात्री व्हिसा यांचा समावेश आहे.
२९ एप्रिल रोजी १० राजदूतांसह एकूण ९४ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारताबाहेर पडले, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी ३६ राजदूत, त्यांचे अवलंबित आणि सहाय्यक कर्मचारी असे १४५ पाकिस्तानी भारत सोडून गेले आणि २७ एप्रिल रोजी नऊ राजदूत आणि अधिकाऱ्यांसह एकूण २३७ पाकिस्तानी आणि २६ एप्रिल रोजी ८१, २५ एप्रिल रोजी १९१ आणि २४ एप्रिल रोजी २८ पाकिस्तानी भारत सोडून गेले.
२९ एप्रिल रोजी पाकिस्तानी व्हिसावर असलेले आठ भारतीय नागरिकही आंतरराष्ट्रीय सीमा क्रॉसिंग पॉइंटवरून भारतातून बाहेर पडले.