“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:33 IST2025-11-08T10:21:46+5:302025-11-08T10:33:38+5:30
PM Modi Vande Bharat Train: वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बांधलेली ट्रेन आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. वाराणसीहून ४ नव्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले.

“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
PM Modi Vande Bharat Train: जगभरातील विकसित देशांमध्ये पायाभूत सुविधा आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक ठरल्या आहेत. ज्या देशांमध्ये लक्षणीय प्रगती आणि विकास झाला आहे, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. भारत देशही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे. या अनुषंगाने, देशाच्या विविध भागांमध्ये नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ४ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदी वाराणसीतून बोलत होते.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बहुतेक देशांच्या विकासात पायाभूत सुविधांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एखाद्या शहराला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली की, त्याचा विकास आपोआपच वेगवान होतो. पायाभूत सुविधा केवळ मोठे पूल आणि महामार्गांपुरत्या मर्यादित नाहीत. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या ट्रेन भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीसाठी पाया रचत आहेत. ही भारतीय रेल्वेचे रूपांतरण करण्यासाठी एक संपूर्ण मोहीम आहे. वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बांधलेली ट्रेन आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
कोणत्या मार्गांवर सुरू झाल्या चार नव्या वंदे भारत ट्रेन?
काशी ते खजुराहो वंदे भारत, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत, लखनऊ-सहारापूर वंदे भारत आणि एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत अशा चार ट्रेनना पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून हिरवा झेंडा दाखवला.या चार नवीन वंदे भारत ट्रेनसह देशात आता १६० हून अधिक नवीन वंदे भारत सेवा कार्यरत आहेत.
दरम्यान, काशीला भेट देणारे सर्व भाविक - मग ते दिल्लीतील असोत किंवा देशाच्या इतर भागातून असोत किंवा परदेशातील असोत. प्रथम काशीमध्ये येतात, नंतर प्रयागराज, चित्रकूट आणि इतर धार्मिक स्थळांना जातात. हा मार्ग आपल्या ऐतिहासिक आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या खजुराहोला जोडतो. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आम्हाला आशा आहे की, एनडीए सरकार भविष्यात असे प्रयत्न करत राहील. आज चार वंदे भारत गाड्या सुरू केल्या जात आहेत, असे स्थानिकांनी म्हटले आहे.