ना नोकरी गेली, ना व्हिसा संपला तरीही अमेरिका सोडलं; भारतीय तरूणानं खरं कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:55 IST2025-02-25T11:54:01+5:302025-02-25T11:55:23+5:30
हा युवक असं जीवन जगत होता ज्याचं स्वप्न लाखो भारतीय युवक पाहतात. परंतु हे सर्व सोडून अचानक त्याने मायदेशी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

ना नोकरी गेली, ना व्हिसा संपला तरीही अमेरिका सोडलं; भारतीय तरूणानं खरं कारण सांगितलं
नवी दिल्ली - एकीकडे अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना शोधून शोधून त्यांच्या देशात पाठवले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेने अनेकांचं ड्रीम अमेरिकेचे स्वप्न धुळीस मिळालं आहे. मात्र काही लोक असेही आहेत जे अमेरिकेतलं आयुष्य नाकारत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे भारतीय संस्कृती आणि नात्यांमधील जिव्हाळ्याचे प्रेम...एक अशीच कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अनिरुद्ध अंजना नावाचा तरूण अमेरिकेत यशस्वी करिअर असतानाही मायदेशी परतला आहे.
अनिरूद्धने अमेरिकेत यशस्वी करिअर बनवलं, त्याचे ड्रीम अमेरिका पूर्णही झाले. हा युवक असं जीवन जगत होता ज्याचं स्वप्न लाखो भारतीय युवक पाहतात. परंतु हे सर्व सोडून अचानक त्याने मायदेशी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ना त्याला कुणी नोकरीवरून काढले, ना व्हिसाची काही समस्या उभी राहिली, ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणाचाही त्याच्यावर फारसा परिणाम नाही तरीही अनिरूद्ध अमेरिकेतल्या जीवन शैलीला रामराम केला.
इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून मन जिंकलं...
अनिरूद्ध, जो ArcAligned कंपनीचा को फाऊंडर आणि सीईओ आहे. अलीकडेच त्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकेतून परतण्याच्या निर्णयाबाबत खरे कारण सांगितले. त्याने लिहिलं की, जेव्हा मी अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना वाटले कदाचित माझी नोकरी गेली असेल अथवा मला व्हिसाबाबत काही अडचणी आल्या असतील. परंतु सत्य हे आहे की, मी माझ्या आई वडिलांसाठी परततोय, त्यांनी कधी मला परत येण्यास सांगितले नाही मात्र त्यांना माझी गरज आहे हे मी जाणतो.
"मी रोबोट बनत चाललो होतो"
अनिरूद्ध मागील १० वर्षापासून अमेरिकेत काम करतोय, त्याने तिथे आपला बिझनेसही सुरू केला होता. परंतु मी हळूहळू एका कॉर्पोरेट जाळ्यात अडकतोय हे मला वाटू लागले. मी एक रोबोट बनतोय आणि मला तसं आयुष्य नको होतं असंही अनिरूद्धने सांगितले. एक वर्षापूर्वी मी जेव्हा कुटुंबासह भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा माझ्या आयुष्यातील मोठा निर्णय होता. मात्र हा माझ्या जीवनातील सर्वात चांगला निर्णय असेल, याने ना फक्त माझ्या आईवडिलांचं आयुष्य वाढेल तर माझेही आयुष्य वाढणार आहे असा विश्वास अनिरूद्धला होता.
दरम्यान, सोशल मीडियावर अनिरूद्धची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकजण त्याच्या निर्णयाचं कौतुक करत हे खरेच प्रेरणादायी आहे असं म्हणत आहेत. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांबाबत असा विचार करायला हवा असं युजर्सने म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांचा मुद्दा चर्चेत आहे. अमेरिकेने आतापर्यंत ३ विमानातून अनेक भारतीयांना परत पाठवले आहे. त्यात एका भारतीय तरूणाने अमेरिका सोडण्याचा निर्णय सगळीकडे व्हायरल झाला आहे.