दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 05:39 IST2025-07-13T05:39:39+5:302025-07-13T05:39:51+5:30
अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी; अपघातस्थळी येतोय जळाल्याचा दर्प

दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट १७१ ला भीषण अपघात होऊन शनिवारी एक महिना पूर्ण झाला. त्या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवासी आणि विमान जिथे कोसळले त्या वसतिगृहातील १९ लोक मृत्युमुखी पडले होते. हा अपघात झाल्यानंतर महिनाभरानेही या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांमध्ये अस्वस्थता व काळजी आहे. ते काहीसे धास्तावलेले असतात.
अपघातस्थळावरील खुणांनी जाग्या होतात भेसूर आठवणी
हे विमान अहमदाबादमध्ये ज्या वसतिगृहावर कोसळले, तिथे जळालेली झाडे, राखेची पुटे कायम असलेल्या भिंती, ओस पडलेल्या इमारती या अपघाताच्या स्मृती जागवत आहेत. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. विमानाचा शेवटचा भाग थेट या मेसच्या इमारतीवर आदळला व प्रचंड आग लागली. अपघातस्थळी अजूनही जळका वास, काळसर धुराने काळवंडलेल्या भिंती आणि विखुरलेले काही अवशेष असे भीतिदायक चित्र आहे. घटनास्थळी अद्यापही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या आहेत विमान अपघातानंतरच्या काही प्रमुख घडामोडी
१२ जून : एअर इंडियाचे सुमारे १२ वर्षे जुने बोईंग ७८७-८ प्रकारातील विमान अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघाले होते. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच ते बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. अपघातात २४२ पैकी केवळ एक प्रवासी वाचला. वसतिगृहातील अनेकांचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या २६० झाली.
१३ जून : एएआयबीने या अपघाताचा तपास सुरू केला. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. अपघाताची कारणमीमांसा करणे आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे असे त्याचे स्वरूप आहे.
१४ जून : नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी जाहीर केलं की, अपघातासंदर्भातील सर्व शक्यता तपासल्या जातील.
२४ जून : अपघातग्रस्त विमानाचे सापडलेले दोन्ही ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठविण्यात आले. एएआयबी प्रयोगशाळेत त्यांची तपासणी सुरू झाली.
२५ जून : ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मोड्यूल मिळविण्यात येऊन डेटा डाऊनलोड करण्यात आला.
जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे...
फ्यूएल स्विचेस म्हणजे काय? : फ्यूएल स्विचेस हे विमानाच्या इंजिनमध्ये जाणारा इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात. या अत्यंत महत्त्वाच्या स्विचेसची हालचाल ही जाणीवपूर्वक करणे आवश्यक असते आणि अपघाताने हे स्विचेस बंद किंवा सुरू करणे जवळपास अशक्य असते. या स्विचेसच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बाजूला ब्रॅकेट असतात. याबरोबरच एक स्टॉप लॉक यंत्रणा असते जी वैमानिकांना स्विच त्याच्या रन (RUN) आणि कट ऑफ (CUT OFF) अशा कोणत्याही एका स्थितीवरून दुसऱ्या स्थितीत हलवण्यापूर्वी ते उचलावे लागते.
कधी हलवले जातात फ्यूएल स्विचेस? : साधारणपणे हे स्विच विमान जेव्हा जमिनीवर असते तेव्हाच हलवले जातात. विमान उड्डाण करण्यापूर्वी इंजिन सुरू करण्यासाठी आणि ते जमिनीवर उतरल्यानंतर इंजिन बंद करण्यासाठी या स्विचचा वापर केला जातो. विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास किंवा त्याचे इतके नुकसान झाले असेल की, विमानाच्या सुरक्षिततेसाठी इंधन पुरवठा बंद करावा लागणार असेल, तरच उड्डाणादरम्यान दोन्ही स्विच हलवण्याची गरज पडते.
एआय १मध्ये काय झाले असू शकते? : एआय १७१ विमान अपघाताबद्दल असे म्हटले जाते की, या विमान दुर्घटनेच्या वेळी टेक-ऑफ करताना विमानाचे एक इंजिन बंद पडल्याची शक्यता आहे आणि वैमानिकाने चुकून बिघाड झालेल्या इंजिनऐवजी सुरू असलेले इंजिन बंद केले. पण याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बचावलेले रमेश ठरले सर्वांत भाग्यशाली व्यक्ती
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातील एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना अनेकजण सर्वांत भाग्यशाली व्यक्ती मानू शकतात. मात्र, त्यांच्यासाठी ही घटना एक भीषण दु:स्वप्न ठरली आहे. यातून सावरणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले आहे. त्यांच्या चुलत भावाने सांगितले की, मानसिक आघातातून सावरण्यासाठी विश्वास सध्या एका मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेत आहेत. विश्वासचे चुलत भाऊ सनी यांनी सांगितले की, "अपघातस्थळाचे दृश्य, चमत्काराने जीव वाचणे आणि भावाच्या मृत्यूच्या आठवणी अजूनही विश्वासचा पाठलाग करत आहेत. आमचे अनेक नातेवाईक त्याच्या तब्येतीची चौकशी करत फोन करतात, पण तो कुणाशीही बोलत नाही. तो अजूनही मानसिक आघातातून पूर्णपणे सावरलेला नाही. तो अजूनही रात्री अचानक उठतो आणि पुन्हा झोपू शकत नाही. दोन दिवसांपूर्वी आम्ही त्याला एका मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्यामुळे त्याने अद्याप लंडनला परतण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.”