महाराष्ट्रात ‘ते’ ७० लाख मतदार आले तरी कुठून?, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:32 IST2025-02-04T05:30:06+5:302025-02-04T05:32:03+5:30
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विस्तृत यादी मागितली आहे.

महाराष्ट्रात ‘ते’ ७० लाख मतदार आले तरी कुठून?, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल
-चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ७० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. शिर्डीमध्ये एका घराच्या पत्त्यावर ७ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे नवीन मतदान महाराष्ट्रात कुठून आले, याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले.
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विस्तृत यादी मागितली आहे. मात्र, निवडणूक आयोग यादी देणार नाही, याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधानांचे कौतुक
बेरोजगारी सर्वात मोठी समस्या असताना राष्ट्रपती यावर एक शब्द बोलल्या नाहीत.
पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यावर भर दिला होता. मात्र, हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. मी पंतप्रधानांना दोष देत नाही. त्यांनी प्रयत्न केले, या शब्दांत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले.
मोबाईलची निर्मिती चीनमध्ये होते.त्याचे एकत्रीकरण भारतात होते. याला ‘मेड इन इंडिया’ म्हणू शकत नाही. सर्वच निर्मिती भारतात कशी होईल यावर एकत्र काम आवश्यक आहे.