लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:23 IST2025-09-01T18:21:39+5:302025-09-01T18:23:23+5:30

प्रेमविवाह करून एकत्र आलेल्या एका दाम्पत्याच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या कटुतेने आता एक गंभीर वळण घेतले आहे.

Even after 22 years of marriage, 'he' is still giving trouble; Wife directly seeks permission from Chief Minister for euthanasia | लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी

लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी

प्रेमविवाह करून एकत्र आलेल्या एका दाम्पत्याच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या कटुतेने आता एक गंभीर वळण घेतले आहे. पतीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका महिलेने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे इच्छामृत्यूची परवानगी मागितली आहे. ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात घडली आहे.

'लव्ह मॅरेज' बनले 'लाइफलेस मॅरेज'
पीडित महिला श्वेता भीलवारने सांगितले की, २२ वर्षांपूर्वी तिने आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या वीरेंद्र भीलवार या ऑडिट अधिकाऱ्याशी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती, तर तिचा पती ३३ वर्षांचा होता. सुरुवातीची काही वर्षे चांगली गेली, पण गेल्या ४-५ वर्षांपासून तिच्या आयुष्यात नरकयातना सुरू झाल्या आहेत. श्वेताचा आरोप आहे की, तिचा पती अत्यंत संशयी आणि भांडखोर स्वभावाचा आहे. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतो. पतीच्या त्रासाला कंटाळून श्वेताने शाळा शिक्षिकेची नोकरी सुरू केली, जेणेकरून मुलांना आधार देता येईल. पण पतीने यावरूनही तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्हीने पाळत, मुलांशी बोलण्यासही बंदी
श्वेताच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने संपूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर तो पाळत ठेवतो. एवढेच नाही, तर मुलांशी बोलण्यावरही त्याने बंदी घातली आहे. "अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला, पण दोन मुलांकडे पाहून स्वतःला सावरले," असे श्वेताने रडत सांगितले.

या संदर्भात तिने अनेक ठिकाणी तक्रार केली, पण तिला न्याय मिळाला नाही. निराश होऊन तिने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'या त्रासातून कायमची मुक्तता करा किंवा इच्छामृत्यूची परवानगी द्या' अशी विनंती केली आहे.

पतीचा आरोप - 'हे सगळं जातीमुळे होतंय!'
या प्रकरणावर पती वीरेंद्र भीलवारने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने याला जातीचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. वीरेंद्रचा दावा आहे की, तो अनुसूचित जातीचा असून श्वेता ठाकूर कुटुंबातील आहे. "श्वेताच्या कुटुंबाला आमच्या लग्नापासून आनंद नव्हता. तेच आमच्यात फूट पाडत आहेत," असे त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Even after 22 years of marriage, 'he' is still giving trouble; Wife directly seeks permission from Chief Minister for euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.