उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील पुरणपुरा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला आपल्या दोन मुलींसह चुलत सासऱ्यांसोबत पळून गेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी महिलेचा पती आणि सासऱ्यांनी महिला आणि मुलांना शोधणाऱ्याला २०,००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरणपुरा गावात राहणारी तीन मुलांची आई असलेली एक महिला आपल्या सासऱ्यांसह पसार झाली आहे. ती महिला तिच्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन गेली आणि मुलाला सासरीच ठेवलं. यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने घरातील दागिनेही चोरून नेले आहेत. एवढेच नाही तर पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने निराश झालेल्या पतीने स्वतः पत्नीला शोधणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षीस जाहीर केलं
पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता व्यक्ती म्हणून नोंद केली होती. इटावाच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांनी दावा केला आहे की, महिला तिच्या सासऱ्यासह पळून गेली आहे आणि लवकरच तिचा शोध घेतला जाईल. स्थानिक लोक पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करत आहेत. घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांना कोणतीही ठोस कारवाई करता आलेली नाही असं सांगितलं.
महिलेच्या पतीने जाहीरपणे त्याची अस्वस्थता आणि निराशा व्यक्त केली आहे. जो कोणी माझी पत्नी आणि मुली शोधून त्यांच्याबद्दल योग्य माहिती देईल त्याला २०,००० रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं म्हटलं आहे. या घोषणेपासून अनेक लोक या प्रकरणात रस दाखवत आहेत आणि ही बातमी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.