कर्नाळा बँक घोटाळ्यातील ३८० कोटींची संपत्ती ईडीकडून परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:14 IST2025-07-31T08:14:49+5:302025-07-31T08:14:49+5:30
बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्नाळा बँक घोटाळ्यातील ३८० कोटींची संपत्ती ईडीकडून परत
नवी दिल्ली : शेतकरी कामगार पक्षाच्या एका माजी आमदाराचे नियंत्रण असलेल्या कर्नाळा सहकारी बँकेची गोठवलेली ३८० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने परत केली आहे. या सहकारी बँकेतील जवळपास पाच लाख ठेवीदारांमध्ये संपत्तीच्या लिलावातून मिळणार पैसा वितरित करण्यासाठी ती महाराष्ट्र सरकारच्या विशिष्ट प्राधिकरणाकडे परत केली आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे प्रकरण पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित आहे. या बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांनी बँकेतील इतर अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक करत खासगी गुंतवणुकीसाठी या पैशाचा वापर केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाकडून चारवेळा आमदार राहिलेले विवेकानंद पाटील यांना जून २०२१ मध्ये ईडीने अटक केली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची दखल घेत ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पाटील व इतर अधिकाऱ्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांचे व मानक बँकिंग मानदंडाचे पालन न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ६३ बनावट कर्ज खाती तयार करून वैयक्तिक लाभासाठी ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले होते. पाटील व त्यांच्या नातेवाइकांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बँकेचा पैसा वर्ग केल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर ईडीने २०२१ व २०२३ मध्ये दोन तात्पुरत्या आदेशांतर्गत ३८६ कोटींची संपत्ती गोठवली.