दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:50 IST2025-05-15T10:48:36+5:302025-05-15T10:50:11+5:30
जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याची मोहीम आता भारतीय सैन्याने हाती घेतली आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीदरम्यान २ दहशतवादी ठार झाले आहेत.

दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतीय सैन्याची दहशतवादा विरोधातील मोहीम आणखीनच तीव्र झाली आहे. काश्मीरच्या खोऱ्यातील भारतीय सैन्य आता अलर्ट मोडवर असून, दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. गुरुवारी (१५ मे) पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले.
दक्षिण काश्मीरमधील पुलवाम जिल्ह्यात त्राल येथील नादिर गावात सुरक्षा दलांनी घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरा केलेल्या या शोध मोहिमेदरम्यान नादिर गावातील दहशतवादी आणि सैन्यात चकमक सुरू झाली. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, आता २ ते ३ अतिरेकी सैन्याच्या जाळ्यात अडकले आहेत. हे ऑपरेशन अजूनही चालू आहे.
२ दहशतवादी ठार!
पुलवामाच्या नादिर त्रालमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत २ दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने पोस्ट करत माहिती देताना सांगितले की, "१५ मे २०२५ रोजी, एका आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि श्रीनगर सेक्टर सीआरपीएफने नादिर, त्राल, अवंतीपोरा येथे शोध मोहीम सुरू केली. सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या आणि त्यांना आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले."
OP NADER, Awantipora
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) May 15, 2025
On 15 May 2025, based on specific intelligence input from Int agency, a Cordon & Search Operation was launched by #IndianArmy, @JmuKmrPolice and @crpf_srinagar at Nader, Tral, Awantipora.
Suspicious activity was observed by vigilant troops and on being… pic.twitter.com/LYmkhswL3b
शोपियानमध्येही झाली चकमक
जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याची मोहीम तीव्र झाली आहे. पुलवामामधील शोध मोहिमेपूर्वी, मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील शुक्रू केलरच्या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईत लष्कराला मोठे यश मिळाले. या दरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले.