Corona Vaccine: १ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 17:32 IST2021-04-25T17:30:20+5:302021-04-25T17:32:15+5:30
Corona Vaccine: कोरोना लसीकरणासाठी आता पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Corona Vaccine: १ मेपासून लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक; अन्यथा लस मिळणार नाही!
नवी दिल्ली: देशातील दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर आणि भयावह होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, कोरोना लसीकरणासाठी आता पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. (eligible beneficiaries age 18 to 45 years must do registration for corona vaccination)
संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाचा सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र, आता कोरोनाची लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. १८ ते ४५ या वयोगटातील कोरोना लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना पूर्वनोंदणी आणि आगाऊ वेळ घेणे आवश्यक आहे. कोव्हिन किंवा आरोग्य सेतू अॅपवर सदर पूर्वनोंदणी करावयाची आहे. अन्यथा कोरोनाची लस दिली जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी हा नियम लागू नसेल, असेही सांगितले जात आहे.
पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा
लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार असल्यामुळे कोरोना केंद्रावरील गर्दी वाढून व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांपर्यंतच्या पात्र सर्वांना कोव्हिन आणि आरोग्य सेतूवर पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे पुढे होणारा गोंधळ टाळता येऊ शकेल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.