Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:00 IST2018-12-11T17:41:32+5:302018-12-11T18:00:04+5:30
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा
मुंबई - देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. तर, तीन राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागल्याने भाजपासाठी हा निकाल चिंताजनक ठरला आहे. तेलंगणात गतवर्षीपेक्षा कमी जागा भाजपच्या पदारात पडल्या असून मिझोरमध्ये केवळ 1 जागेवर भाजपाला समाधान मानावे लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यात काँग्रेसला यश आले असे, म्हणता येईल.
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. मात्र, भाजपला येथे सत्ता गमवावी लागली. तर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथील सत्तेच्या सारीपाटावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही जोतिर्रादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अच्छे दिन आल्याचे दिसून येते. तसेच, तेलंगणात भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. गतवर्षीच्या निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपाला 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपाचा एकच उमेदवार तेलंगणातून निवडणून आला आहे. तेलुगू लोकांनी भाजपला नाकारत प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्टपणे स्विकारले आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपाला सत्ता राखण्यात अपयश आले आहे. छत्तीसडमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेत एकहाती सत्ता मिळवली आहे. छत्तीसगड 2013 मध्ये 49 जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 39 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदा येथे उलटे चित्र पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 63 जागांवर विजय मिळवेल, अशी परिस्थीती आहे. तर भाजपच्या जवळपास 32 जागा कमी होणार आहेत.
मिझोरममध्ये गतवर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र, येथून काँग्रेसला सत्ता सोडावी लागणार आहे. कारण, मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येत आहे. येथे बहुमताचा आकडा 21 असून एमएनएफची 26 जागांवर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची सद्यस्थिती.
एकूण जागा - १९९
बहुमताचा आकडा - १०१
भाजपा - ७२ (-९१)
काँग्रेस - १०१ (+८०)
इतर - २६
मध्य प्रदेश
एकूण जागा - २३०
बहुमताचा आकडा - ११६
भाजपा - १०४ (-६१)
काँग्रेस आघाडी - ११७ (+५९)
बसपा - २
इतर - ७
छत्तीसगड
एकूण जागा - ९०
बहुमताचा आकडा - ४६
भाजपा - १७ (-३२)
काँग्रेस - ६३ (+२४)
बसपा+ - 4
इतर - ५
तेलंगणा
एकूण जागा - ११९
बहुमताचा आकडा - ६०
टीआरएस - ८७ (+२४)
काँग्रेस + टीडीपी - २२
भाजपा - १ (-४)
इतर - ९
मिझोरम
एकूण जागा - ४०
बहुमताचा आकडा - २१
काँग्रेस - ५
मिझो नॅशनल फ्रंट - २६
भाजपा+ - 1
इतर - ८
या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थान, मध्य प्रदेश अन् मिझोरमध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निकाल भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. तेलंगणात भाजपला अद्याप केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर मिझोरमध्येही एका जागेवर भाजपा आघाडीवर आहे.