निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:00 IST2025-11-14T10:51:56+5:302025-11-14T11:00:05+5:30
ECI Website Technical Errors: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील तांत्रिक त्रुटीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर वेगाने अपडेट होत असले तरी, मतमोजणीच्या सुरुवातीला एका तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. वेबसाइटवरील डेटा फीडमध्ये समस्या आल्यामुळे आकडे आणि उमेदवारांचा 'स्टेटस' चुकीच्या पद्धतीने दर्शवले गेले.
या तांत्रिक त्रुटीमुळे वेबसाइटवर अनेक ठिकाणी विसंगती आढळल्या. काही ठिकाणी, पुष्पम प्रिया चौधरी यांच्या प्लुरल्स पार्टीच्या उमेदवाराला एका जागेवर आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्या जागेच्या तपशिलात गेल्यावर सत्य प्रकाश यांना केवळ १४ मते मिळाली होती, तरीही ते आघाडीवर होते. याउलट, राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार दीपू सिंग यांना २ हजार ९६० मते मिळूनही ते पिछाडीवर असल्याचे दर्शवण्यात आले.

सर्वाधिक गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे, आघाडीवर असलेल्या उमेदवारांसह बहुतेक उमेदवारांच्या नावापुढे "पराभूत" असे लिहिल्याले दिसत होते. जेडीयूचे आघाडीचे उमेदवार मनोरंजन सिंह यांना ३ हजार १७५ मते मिळाली असूनही त्यांना पराभूत दाखवण्यात आले. दुसरीकडे, ज्या उमेदवारांना खूप कमी मते मिळाली होती, त्यांना आघाडीवर दाखवण्यात आले. जवाहर प्रसाद आणि अभिजीत अभिज्ञान यांना अनुक्रमे फक्त ४५ आणि ३८ मते मिळाली असूनही, ते आघाडीवर असल्याचे वेबसाइटवर दिसत होते.
निवडणूक आयोगाच्या डेटा फीडमधील तांत्रिक बिघाड किंवा समस्येमुळे हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली. ही समस्या नंतर सोडवण्यात आली असून, आता वेबसाइटवर मतमोजणीचे आकडे अचूकपणे प्रदर्शित होत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात जेडीयू आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहेत, तर तेजस्वी यादव यांच्या राजदला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर जेडीयू ७६ जागेवर आघाडीवर आहे. तर, भाजप- ६८, आरजेडी- ५० आणि काँग्रेस १२ जागेवर आघाडीवर आहे.