निवडणूक आयोगाचा भाजपला 'दे धक्का'; अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:56 IST2019-03-13T14:47:58+5:302019-03-13T14:56:29+5:30
सभा आणि भाषणांव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विविध पक्षांच्या आणि नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि पेजेसवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाचा भाजपला 'दे धक्का'; अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचे आदेश
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच भारतीय निवडणूक आयोगाने विविध पक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सभा आणि भाषणांव्यतिरिक्त आयोगाकडून विविध पक्षांच्या आणि नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि पेजेसवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे आमदार ओमप्रकाश शर्मा यांच्याकडून फेसबुकवर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. मात्र तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने फेसबुकवरील अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचा आदेश आमदार शर्मा यांना दिला आहे. तसेच सैन्यासंदर्भात पोस्टवर फेसबुकने देखील लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.
याआधीच राजकीय पक्षांना आणि पुढाऱ्यांना प्रचाराच्या पोस्टर, बॅनरवर सैन्याचा किंवा जवानांचा फोटो वापरण्यास सक्त मनाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनेक नेत्यांकडून विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटो प्रचारात वापरण्यात येत होता. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
निवडणूक आयोगाने केवळ फेसबुकलाच नव्हे तर सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरला देखील प्रचारासंदर्भातील वादग्रस्त समाग्री साईट्सवरून हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून सोशल मीडियावर प्रचारात अभिनंदन यांचा फोटो वापरण्यात येत असल्याची तक्रार करण्यात केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली.