बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:57 IST2025-07-13T13:33:43+5:302025-07-13T13:57:10+5:30
Election Commission : 'बिहारच्या मतदार यादीमध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशच्या नागरिकांसह मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
Election Commission : बिहार निवडणुकीआधीच मतदार यादीतील गोंधळ समोर आला आहे. मतदार पडताळणी मोहिमेत एक मोठा खुलासा झाला आहे. बिहारच्या मतदार यादीत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे आहेत, यामध्ये नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशचे नागरिक आहेत',अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या परदेशी लोकांकडे मतदार कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड देखील आहेत. निवडणूक आयोगाने घरोघरी पडताळणी करुन माहिती घेतली, यामध्ये मोठा खुलासा झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, त्यांची नावे अंतिम मतदार यादीत राहणार नाहीत. SIR चा उद्देश मतदार यादीतून बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणे आहे. मतदार पडताळणीच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणादरम्यान, या वस्तुस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण काँग्रेससह महाआघाडीतील सर्व पक्ष या मोहिमेला विरोध करत आहेत.
'या सर्व लोकांची नावे ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून काढून टाकली जातील. देशभरात मतदार पडताळणी केली जाईल जेणेकरून चुकीच्या मार्गाने कार्ड मिळवून मतदार बनलेल्या परदेशी घुसखोरांना मतदार यादीतून काढून टाकले जाईल. यासाठी त्यांचे जन्मस्थान पडताळले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
'शनिवारपर्यंत बिहारमध्ये जारी केलेल्या एसआयआर अंतर्गत ८०.११ टक्के मतदारांनी त्यांचे फॉर्म सादर केले आहेत. फॉर्म सादर करण्याची प्रक्रिया निर्धारित अंतिम मुदतीपर्यंत (२५ जुलै) पूर्ण केली जाणार आहे, असा दावा निवडणूक आयोगाने केला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता, मतदार पुनरीक्षणाचा मुद्दा देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विरोधी पक्षांनी ते थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ते थांबवण्यास नकार दिला तर निवडणूक आयोगाला काही सूचना दिल्या.