'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 11:33 IST2019-03-29T11:32:45+5:302019-03-29T11:33:23+5:30
निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीबाबत देशाला संबोधित केल्याने वादाला तोंड फुटले होते.

'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट
नवी दिल्ली - निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीबाबत देशाला संबोधित केल्याने वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, निवडणूक आयोगानेही मोदींच्या संबोधनाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आता निवडणूक आयोगाने त्या संबोधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे.
भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह बुधवारी पाडला होता. या मोहिमेला मिशन शक्ती असे नाव देण्यात आले होते. दरम्यान, अंतराळातील उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश बनल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केली होती. त्यानंतर ऐन आचारसंहितेच्या काळात मोदींनी देशाला संबोधित केल्याने वादाला सुरुवात झाली होती.
मात्र देशाला संबोधित करताना मोदींनी कुठल्याही पक्षाचे नाव घेतले नव्हते. तसेच कुणालाही मतदान करण्याचे आवाहनही केले नव्हते. त्यामुळे मोदींच्या संबोधनातून आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. अखेरीस निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीमध्येही ही बाब समोर आल्याने मोदींना क्लीन चिट देण्यात आली आहे.