धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:43 IST2025-11-12T11:43:03+5:302025-11-12T11:43:41+5:30
न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर १९ व्या क्रमांकावर शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे.

धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
नवी दिल्ली - गेल्या ३ वर्षापासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दोन्ही पक्षाचे वकील अंतिम युक्तिवाद करतील. त्यानंतर कोर्टाकडून या खटल्यावर निकाल येणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांसह उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानेही शिंदेंच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह घ्यावे लागले. परंतु हा संपूर्ण वाद सुप्रीम कोर्टात गेला. त्यावर वेळोवेळी सुनावणी पार पडली. मात्र आता या खटल्याच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यात आमदारांच्या अपात्रतेबाबतही कोर्ट निकाल देणार आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या याचिकेवरही आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी सुप्रिया सुळे, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत.
न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर १९ व्या क्रमांकावर शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. मागील ३ वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांना बहाल केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. याआधीच्या सुनावणीत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून निकाल दिला. यावेळी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आले होते.
आतापर्यंत काय काय घडलं?
८ ऑक्टोबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाला धनुष्यबाण वापरण्यास बंदी घातली.
१७ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे नवे चिन्ह दिले.
२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या निर्णयावर स्थगिती नाकारली.
२०२४ ते २०२५ या काळात कलम ३७० वरील प्रकरणामुळे वारंवार सुनावणीला विलंब झाला. अनेक वेळा या खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १४ जुलै २०२५ रोजी उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात अर्ज करून तातडीची सुनावणी करण्याची मागणी केली, पण कोर्टाने ऑगस्ट महिन्यात सुनावणी घेऊ असं सांगितले. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा ठाकरेंच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणीची मागणी केली, मात्र तेव्हाही ही सुनावणी होऊ शकली नाही. आता १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सुप्रीम कोर्टात या खटल्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. ही सुनावणी निर्णायक टप्प्यावर असल्याने सुप्रीम कोर्ट शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.