एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:25 IST2025-10-25T17:21:22+5:302025-10-25T17:25:56+5:30
नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
नवी दिल्ली - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीतील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाणे, नवी मुंबई याठिकाणी भाजपा नेते उघडपणे स्वबळाची भाषा करत आहेत. दुसरीकडे मुंबईत भाजपाने १५० प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने विविध चर्चांना उधाण आले. या दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील मतभेदावर भाष्य केले. शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब आहे. नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यासोबतच पुण्यातील शिंदेसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन असं शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, बिहारमधील निवडणुकीत एनडीएचा बहुमताने विजय होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सोबतच मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागलेत. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. त्यामुळे तिथे एनडीएला बहुमत मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी दावा केला.
📍#नवी_दिल्ली |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2025
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची आज नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आदरणीय मोदीजींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी अनेक विषयावर सकारात्मक… pic.twitter.com/mOvTjAXHOR
'त्या' दोषींवर कठोर कारवाई होईल
साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.