Eknath Shinde Amit Shah Meeting: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी हा यातील एक चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय स्तरावर सर्वकाही आलबेल नाही अशा चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं, याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली.
"माझी अमित शहा यांच्याशी सदिच्छा भेट होती. कालच्या एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचे कौतुक केले होते. गृहमंत्री म्हणून सर्वाधिक काळ चांगले काम करणारे मंत्री असा त्यांनी अमित शहा यांचा गौरव केला. अमित शहा यांना अजूनही पुढे बरेच काम करायचे आहे असेही मोदीजी म्हणाले. याच अनुषंगाने अमित शहा यांचे अभिनंदन करण्यासाठी आज माझी ही सदिच्छाभेट होती. एनडीए स्थापन होण्याआधीपासून शिवसेना आणि भाजप यांची युती होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेने भाजपाच्या विचारधारेशी युती केली होती. २५ वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत आणि यापुढेही आम्ही महायुतीत एकत्र लढू," असे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी भेटीनंतर सांगितले.
"अमित शहा यांच्याबरोबर मी बैठकीला गेलो असताना माझ्याबरोबर आमच्या पक्षाचे खासदारही होते. आमची एकत्रित एक बैठक झाली. त्यानंतर माझी अमित शाह यांच्याशी स्वतंत्र चर्चाही झाली. महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलो, महायुती म्हणून विधानसभाही जिंकलो. तसेच आम्ही महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था ही जिंकणार आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. आमची बैठक अतिशय सकारात्मक झाली. केंद्रीय गृहमंत्रीही याबाबत सकारात्मक होते," असे ही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.