दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 05:42 IST2025-07-20T05:42:11+5:302025-07-20T05:42:30+5:30
दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी सुमारे १६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) असताना दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी सुमारे १६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
४५ वर्षीय राज हे २००९च्या बॅचचे अधिकारी आहेत. सूत्रांनी सांगितले की, त्यांनी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ राजीनामा दिला आहे. निवृत्तीचे वय ६० वर्षे असल्याने त्यांची अजूनही सुमारे १५ वर्षे सेवा शिल्लक होती. राज यांनी ईडीमध्ये जवळजवळ आठ वर्षे सेवा केली
कारवाईवर बारीक लक्ष
ईडीमध्ये असताना, त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये रांची येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवले होते. काही महिन्यांनंतर, मार्च २०२४ मध्ये, दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी ईडीच्या झडतीनंतर राज हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
नीरव मोदी, मेहुल चोक्सी अन् इतरांची केली चौकशी
ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज राजकीय अटकांसाठी चौकशी प्रश्नावली तयार करत आणि अंतिम रूप देत असत. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी ते अनेकदा शोधमोहिमांमध्ये घटनास्थळी पोहोचत असत.
मुंबईत ईडीचे उपसंचालक म्हणून काम करताना त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी देखील केली होते. राज हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.