आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानासह १३ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ही कारवाई रुग्णालय बांधकाम घोटाळ्याशी संबंधित आहे.आम आदमी पक्षाच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या २४ रुग्णालय प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निधीचा गैरवापर केल्याचा सौरभ भारद्वाज यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणात प्रथम लाचलुचपत विभागाने (एसीबी) जूनमध्ये गुन्हा दाखल केला, त्यानंतर जुलैमध्ये ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.
ईडीच्या म्हणण्यानुसार,आम आदमी पक्षाच्या सरकारने २०१८-१९ मध्ये २४ रुग्णालय प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सहा महिन्यांत आयसीयू रुग्णालये तयार करण्याची योजना होती, परंतु असे म्हटले जाते की काम अद्याप पूर्ण झाले नाही, तर ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. आतापर्यंत फक्त ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रुग्णालये, पॉलीक्लिनिक आणि आयसीयू पायाभूत सुविधांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता, अनावश्यक विलंब आणि निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, रुग्णालयाचा खर्च ४८८ कोटी रुपयांवरून १ हजार १३५ कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि एकही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झाला नाही.
या प्रकरणाची तक्रार २२ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी केली होती. त्यांनी माजी आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्यावर प्रकल्पांच्या बजेटमध्ये फेरफार, सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि खाजगी कंत्राटदारांशी संगनमत केल्याचा आरोप केला होता.