Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:54 IST2025-10-24T15:53:30+5:302025-10-24T15:54:28+5:30
Indian Railway News: रेल्वे ट्रॅकजवळ चित्रीकरण करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना मोठ्या दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात येईल.

Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
दोन दिवसांपूर्वी ओडिशातील पुरी येथे रेल्वे रुळाजवळ व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ट्रेनच्या धडकेत एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे रेल्वे ट्रॅकजवळ चित्रीकरण करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना मोठ्या दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
ईस्ट कोस्ट रेल्वेने गुरुवारी अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की, "रेल्वे ट्रॅक, स्टेशन परिसर आणि चालत्या गाड्यांचे फूटबोर्ड हे जोखीम असलेले 'ऑपरेशनल क्षेत्र' आहेत, ते मनोरंजक व्हिडिओ बनवण्यासाठी नाहीत. या ठिकाणी बेकायदेशीरपणे प्रवेश करणे किंवा धोकादायक स्टंट करणे हे केवळ जीवघेणेच नाही, तर हा मोठा गुन्हा गुन्हा आहे."
आरपीएफ आणि जीआरपी यांना अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. रेल्वे कायद्याच्या कलम १४७ आणि १५३ अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवर खटला चालवला जाईल, ज्यामध्ये तुरुंगवास आणि मोठा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. यासंदर्भात ईस्ट कोस्ट रेल्वेने डिजिटल मीडियाद्वारे आणि गस्त वाढवून जागरूकता मोहीम तीव्र केली आहे.