दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 23:30 IST2025-09-04T23:30:07+5:302025-09-04T23:30:48+5:30
Earthquake in Delhi: सोशल मीडियावर लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा केला आहे. सततच्या पावसानंतर भूकंप, दिल्लीवासियांना हा काळ योग्य नाही असे दिसतेय, असे एका युजरने म्हटले आहे.

दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाबमध्ये महापूर आला आहे. यमुना नदीने आजही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. अशातच दिल्लीमध्येभूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे आधीच जीव मुठीत घेऊन राहत असलेल्या दिल्लीकरांमध्ये खळबळ उडाली होती.
सोशल मीडियावर लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा केला आहे. सततच्या पावसानंतर भूकंप, दिल्लीवासियांना हा काळ योग्य नाही असे दिसतेय, असे एका युजरने म्हटले आहे. तर अन्य एकाने 'जगात कुठेही भूकंप येतो तेव्हा दिल्ली-एनसीआर का हादरते?' असे म्हटले आहे. 'मुसळधार पाऊस, पूर आणि आता दिल्लीत भूकंप.', असे आणखी एका युजरने म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीरमध्ये रात्री थोड्या वेळापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी (४ सप्टेंबर) आग्नेय अफगाणिस्तानातील काही भागात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के पाकिस्तान, दिल्ली, काश्मीरपर्यंत जाणवले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानात मोठा भूकंप झाला आहे. अफगाणिस्तानात झालेल्या प्राणघातक भूकंपात २,२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात रशियाच्या समुद्रात मोठा भूकंप झाला होता. या भूकंपाने निर्माण झालेल्या समुद्रात्या लाटा जपान ते अमेरिकेपर्यंत उसळल्या होत्या.