दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:09 IST2025-11-02T09:09:33+5:302025-11-02T09:09:57+5:30
Dular Chand Yadav murder case: एकेकाळचे लालूप्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक आणि सध्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असलेले नेते दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी मोकामा मतदारसंघातील जेडीयूचे उमेदवार आणि बाहुबली नेते अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, एकेकाळचे लालूप्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक आणि सध्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असलेले नेते दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी मोकामा मतदारसंघातील जेडीयूचे उमेदवार आणि बाहुबली नेते अनंत सिंह यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यादरम्यान, रात्रपरभ पाटण्यापासून बाढपर्यंत आणि बाढपासून पाटण्यापर्यंत पोलिसांच्या वेगवान हालचाली सुरू होत्या.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाटणा पोलिसांची टीम मोकाामामधील दुलारचंद यादव यांच्या हत्येचा तपास करत होती. दरम्यान, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी एसएसपी कार्तिकेय शर्मा हे बाढ येथील कारगिल मार्केटमध्ये पोहोचले. तिथे अनंत सिंह हे त्यांच्या समर्थकांसमवेत उपस्थित होते. त्यांनी तिथे अनंत सिंह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी अनंत सिंह यांना ताब्यात घेऊन पोलिसांचं पथक बाढ येथून रवाना झालं. या हत्येप्रकरणी अनंत सिंह यांच्यासह मणिकांत ठाकूर आणि रंजित राम यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
अनंत सिंह यांना ताब्यात घेऊन पाटणा येथे येत असलेल्या पोलिसांच्या पथकाला पाटणा येथे पोहोचण्यास उशीर झाला. अखेरीस रात्री १.४५ वाजता पोलिसांच पथं अनंत सिंह यांना घेऊन पाटणा येथे दाखल झालं. त्यानंतर रात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात आली. एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत अनंत सिंह यांच्या अटकेला दुजोरा दिला.
मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या हत्ये प्रकरणी पाटण्याचे एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, हत्या झालेले दुलारचंद यादव हेसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. तसेच ही घटना घडली तेव्हा आचारसंहितेचं उल्लंघन झालं होतं. या हत्ये प्रकरणी अनंत सिंह, मणिकांत ठाकूर आणि रंजित राम यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. तसेच व्हिडीयो फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.