ताम्रपत्राविनाच झाले मान्यवरांचे स्वागत अखेरपर्यंत घोळ : नमुना तपासणीत विलंब
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:34+5:302015-08-19T22:27:34+5:30
नाशिक : साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या जगत्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करायचा आणि येणार्या मान्यवर अतिथींचेही ताम्रपत्र देऊन थाटामाटात स्वागत करायचे, असा निश्चय महापालिकेने केला होता खरा; परंतु अखेरपर्यंत ताम्रपत्र हाती आलेच नाहीत आणि ताम्रपत्राविना केवळ पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. प्रशासनाकडूनच नमुना तपासणीला विलंब लागल्याने हा सारा घोळ झाल्याचे समजते.

ताम्रपत्राविनाच झाले मान्यवरांचे स्वागत अखेरपर्यंत घोळ : नमुना तपासणीत विलंब
न शिक : साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या जगत्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करायचा आणि येणार्या मान्यवर अतिथींचेही ताम्रपत्र देऊन थाटामाटात स्वागत करायचे, असा निश्चय महापालिकेने केला होता खरा; परंतु अखेरपर्यंत ताम्रपत्र हाती आलेच नाहीत आणि ताम्रपत्राविना केवळ पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. प्रशासनाकडूनच नमुना तपासणीला विलंब लागल्याने हा सारा घोळ झाल्याचे समजते. महापालिकेने प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करण्याचा निश्चय केला आणि सोहळ्यात कसलीही कमतरता भासणार नाही यादृष्टीने तयारी केली. सोहळ्यासाठी येणार्या मान्यवर प्रमुख अतिथींसह प्रमुख आखाड्यांच्या संत-महंतांना महापालिकेच्या वतीने ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्याची संकल्पना समोर आली. ताम्रपत्र हे कायमस्वरूपी त्यांच्याकडे राहील, असा विचार करत ते संस्कृत भाषेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रशासनाकडून निविदाही मागविण्यात आल्या. ताम्रपत्रावरील मायना ठरला, त्याचा आकार निश्चित झाला. त्यानुसार मक्तेदाराने नमुना तपासणीसाठी प्रशासनाकडे दिला. परंतु नमुना तपासणीला इतका विलंब लावण्यात आला की सोहळ्याच्या आदल्या दिवसापर्यंत घोळ सुरू होता. नमुनाच हाती न आल्याने मक्तेदाराचीही पंचाईत होत गेली. सुमारे १५ ते २० ताम्रपत्रांची ऑर्डर देण्यात आली होती. मंगळवारी रात्री उशिरा मक्तेदाराच्या हाती ताम्रपत्राचा नमुना पडल्याचे समजते. मात्र, ताम्रपत्र हे काही छापील प्रशस्तिपत्रक नव्हे तर त्यासाठी कारागिरांना कोरीवकाम करावे लागते. एक ताम्रपत्र तयार करण्यासाठी काही तास जातात. परंतु, शासकीयता भिनलेल्या प्रशासनाकडून अखेरपर्यंत घोळ घातला गेल्याने ताम्रपत्र तयारच होऊ शकले नाहीत. बुधवारी प्रत्यक्ष सोहळ्याप्रसंगी ताम्रपत्र न आल्याने महापालिकेला अखेर शाल व पुष्पगुच्छ देऊनच मान्यवरांना सन्मानित करावे लागले.