दारूच्या नशेत माकडाचा बारमध्ये धुमाकूळ, उपस्थितांनी काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:01 IST2018-02-14T17:00:19+5:302018-02-14T17:01:23+5:30
दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका माकडानं चक्क बारमध्ये धुमाकूळ घातला आहे. बारमध्ये माकडानं इकडेतिकडे उड्या मारून सर्व सामानाची मोडतोड केली आहे.

दारूच्या नशेत माकडाचा बारमध्ये धुमाकूळ, उपस्थितांनी काढला पळ
बंगळुरू- दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका माकडानं चक्क बारमध्ये धुमाकूळ घातला आहे. बारमध्ये माकडानं इकडेतिकडे उड्या मारून सर्व सामानाची मोडतोड केली आहे. माकडाच्या लीलांनी वैतागलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. तर काहींनी त्या माकडाचा व्हिडीओदेखील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये माकड जबरदस्त हैदोस घालत असताना पाहायला मिळतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतल्या बनासवाडी इथल्या कमनहल्लीमधील एका बार आणि रेस्ताराँमध्ये हा माकड आला आणि उरलेलं जेवण जेवल्यानंतर तो ग्लासातील दारूसुद्धा प्यायला. या बारजवळ नेहमी माकडांची ये-जा असते. रेस्ताराँतील उरलेल्या अन्न खाण्यासाठी इथं माकडांची रिघ असते. असाच एक माकड हॉटेलमध्ये प्रवेशकर्ता झाला आणि तो टेबलावर ठेवलेल्या ग्लासातील दारू प्यायला. त्यानंतर त्यानं बारमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.
दरम्यान, माकड स्वतःहून दारू प्यायला की कोणी त्याला पाजली होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माकडाच्या त्रासाला कंटाळून काही लोकांनी बारमधून बाहेर पडणं पसंत केलं. तर काही पाणीमित्रांनी त्याला बारपासून दूर नेण्यासाठी केळं आणि पाण्याचं आमिष दाखवलं. रात्रभर तो माकड बार आणि रेस्ताराँमध्ये धुमाकूळ घालत होता. रात्री उशिरा एका रिक्षाचालकानं त्याला पकडलं आहे.