मुस्लिम समाजातील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण घटले - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 07:02 IST2020-12-23T02:07:05+5:302020-12-23T07:02:40+5:30
Narendra Modi : देशाचा विचार करताना, वैचारिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असाही संदेश पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.

मुस्लिम समाजातील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण घटले - नरेंद्र मोदी
लखनौ : गेली अनेक दशके देशातील मुस्लीम समाजात मुलींनी शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक होते; परंतु स्वच्छ भारत मिशननंतर आज हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. मुस्लीम अलिगढ विद्यापीठात आज ३५ मुली शिक्षण घेत आहेत. एक मुलगी शिकली की, संपूर्ण पिढीची प्रगती होते, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी येथील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना काढले.
मागच्या शतकात आपसातील मतभेदांमध्ये आपला खूप वेळ वाया गेला. आपल्याला आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. देशाचा विचार करताना, वैचारिक मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असाही संदेश पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोरोना लसीसंदर्भात सरकारला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हे विद्यापीठ म्हणजे मिनी इंडिया आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, तसेच संस्कृत शिकविली जाते. येथील ग्रंथालयात कुराण आहे. त्याचप्रमाणे, गीता आणि रामायणाचे भाषांतरही उपलब्ध आहे.